बॉलीवूडसह मराठी कलाकारांनी नवनवीन संकल्प करत २०२३ मधील शेवटचा दिवस धुमधडाक्यात साजरा केला. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अनेक कलाकार कोकण, गोवा, पाँडेचेरी तर काहीजण आपल्या कुटुंबासह परदेश दौऱ्यावर गेले होते. २०२३ हे वर्ष कसं गेलं हे आपल्या चाहत्यांना सांगण्यासाठी अनेक कलाकारांनी सोशल मीडिया पोस्ट शेअर केल्या होत्या. अशातच अभिनेत्री अमृता खानविलकरने शेअर केलेली इन्स्टाग्राम स्टोरी सध्या चर्चेत आली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून अमृता गंभीर आजारांचा सामना करत असल्याचं अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं आहे. अमृताला नेमका कोणता आजार झालेला? आणि सध्या तिची प्रकृती कशी आहे? याबाबत तिने आपल्या चाहत्यांना या पोस्टद्वारे अपडेट दिली आहे.

हेही वाचा : ठरलं! शिवानी सुर्वे – अजिंक्य ननावरे २०२४ मध्ये बांधणार लग्नगाठ; पाँडेचेरीतून शेअर केला रोमँटिक फोटो, कॅप्शनने वेधलं लक्ष

अमृता खानविलकर पोस्ट शेअर करत लिहिते, “गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यू आणि ब्राँकायटिस या आजारांचा मी सामना करत आहे. या काळात खरंच खूप त्रास झाला. मी काहीतरी नवीन करू शकते असं ज्या क्षणी वाटलं तेव्हाच हा त्रास सुरू झाला…पण यामुळे मी धीराने उभी राहायला शिकले. वर्षाचा हा शेवटचा दिवस मला माझ्या पद्धतीने साजरा करायचा आहे. आपण आहे तसं राहिलो की, सगळेजण आपलं अनुकरण करतात. तुम्ही सुद्धा आयुष्यात संघर्ष करत असाल, तर माझ्यावर विश्वास ठेवा आणि सगळ्यात आधी स्वत:चा विचार करा आणि धीर धरा. सगळं काही ठिक होईल. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!”

हेही वाचा : यंदा कर्तव्य आहे! प्रथमेश परबने होणाऱ्या बायकोसह शेअर केला केळवणाचा फोटो, लग्नाच्या तारखेबाबत म्हणाला…

अमृता खानविलकर

दरम्यान, अमृता सध्या या दोन्ही आजारांतून हळुहळू बरी होत असल्याचं तिचे फोटो-व्हिडीओ पाहून लक्षात येत आहे. आता या नववर्षात अभिनेत्री बहुचर्चित ‘कलावती’ चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. याशिवाय तिचे इतर काही चित्रपटही प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत.