Amruta Khanvilkar : यंदा २ मे रोजी केदारनाथ धाम मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. दिवाळीनंतरचे जवळपास ६ महिने हे मंदिर बर्फवृष्टीमुळे भाविकांसाठी बंद असतं. त्यामुळे मंदिराचे द्वार उघडल्यावर देशभरातील लाखो भाविक मोठ्या संख्येने केदारनाथ यात्रेला जातात.
यावर्षी बॉलीवूडसह मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार केदारनाथ यात्रेला गेल्याचं पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रथमेश शिवलकर केदारनाथला जाऊन आला. आता या पाठोपाठ अमृता खानविलकर व प्राजक्ता माळी या लोकप्रिय अभिनेत्री एकत्र केदारनाथला गेल्या होत्या.
प्राजक्ता व अमृताने केदारनाथ यात्रेचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याशिवाय अमृताने तिच्या केदारनाथ यात्रेदरम्यानचा विलक्षण अनुभव चाहत्यांना सांगितला आहे.
अमृता खानविलकरची पोस्ट
गेल्या काही वर्षांत योगाभ्यास करताना मी एक गोष्ट शिकले ती म्हणजे, योगा केवळ शरीराच्या हालचालींसाठी नव्हे तर मनाच्या स्थिरतेसाठी करणंही आवश्यक आहे. ती स्थिरता तुम्हाला एक चांगला माणूस कसं बनायचं हे सुद्धा शिकवते. यामुळे निर्णय घेण्याची क्षमता वाढते, जे आपल्यासाठी महत्त्वाचं नाहीये अशा गोष्टी सोडून देण्यास मदत होते.
यावर्षी, मला असं वाटले की दैनंदिन सराव महत्त्वाचा असला तरी, कधीकधी सर्वकाही सोडून देणं तितकंच महत्त्वाचं असतं. अशा अनुभवांच्या शोधात निघायचं जिथे तुम्हाला तुमचं मन तुम्हाला आणखी विचार करायला भाग पाडेल…एक वेगळीच अनुभूती मिळेल आणि माझ्यासाठी तो अनुभव होता केदारनाथ.
ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी, पहाटे ३:३० वाजता, आम्हाला मंदिरात दर्शन घेण्याचं भाग्य लाभलं. त्या क्षणापासून ते सकाळी ९ वाजेपर्यंत, मी स्वतःकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिलं. मंदिराचा भव्य परिसर, ती शांतता खरंच भारावून गेले…सकाळ होताच हळुहळू बर्फाच्छादित पर्वत आपल्याला डोळ्यासमोर दिसू लागतात…सूर्याच्या पहिल्या किरणांनी मंदिराच्या मागे असलेल्या बर्फाळ शिखरांना स्पर्श केला तेव्हा मला शब्दांपलीकडे धन्यता वाटली.
केदारनाथला भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा असा वेगवेगळा अनुभव आला असेल. माझंही अगदी तसंच झालं…तो अनुभव मी कायमस्वरुपी माझ्या घरी घेऊन जातेय. माझ्या हृदयात आणि माझ्या श्वासात… प्रिय प्राजक्ता पुन्हा एकदा तुझे खूप खूप आभार…
दरम्यान, प्राजक्ता माळी गेल्या काही महिन्यांपासून तिची १२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण करत आहे. केदारनाथ मंदिरात दर्शन घेतल्यावर अभिनेत्रीने “११ व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन निर्विघ्नपणे पार पडलं यावेळी अमृता आमच्याबरोबर सहभागी झाली याचा विशेष आनंद होता” असं पोस्ट शेअर करत म्हटलं होतं. अमृता व प्राजक्ताने पायी चालत ही यात्रा पूर्ण केल्याने नेटकऱ्यांनी या दोघींवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.