Chhaya Kadam Cannes Look : ७८ वा ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ सोहळा (Cannes Film Festival 2025) नुकताच पार पडला. बॉलीवूडच्या असंख्य अभिनेत्रींनी यावर्षी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. मराठी कलाविश्वातील काही सेलिब्रिटी देखील या सोहळ्याला उपस्थित होते. लोकप्रिय मराठी अभिनेत्री छाया कदम यांनी यंदा सलग दुसऱ्या वर्षी कान्स महोत्सवाला हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.
छाया कदम गेल्यावर्षी आईची साडी नेसून कान्स महोत्सवाला पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांच्या लूकचं सर्वत्र भरपूर कौतुक करण्यात आलं होतं. यावर्षी देखील या फेस्टिव्हलच्या शेवटच्या दिवशी छाया कदम यांनी त्यांच्या गावच्या मैत्रिणींनी दिलेली साडी नेसली होती. या सगळ्या जणींनी मिळून त्यांचा सत्कार केला होता. यादरम्यान, अभिनेत्रीला या मैत्रिणींकडून साडी भेट देण्यात आली होती.
छाया कदम यांनी आपल्या कान्स लूकबद्दल नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये खुलासा केला आहे. जवळच्या मैत्रिणींनी दिलेली साडी अन् आईचे कानातले व नथ घालून शेवटच्या दिवशी कान्सच्या समुद्रावर खूप मिरवले असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
Cannes 2025 – छाया कदम यांची पोस्ट
Cannes Film Festival आणि साडी हे जणू माझ्यासाठी एक सुंदर असे समीकरणच जुळून येत आहे. मागील वर्षी आईची साडी आणि नथ मला Cannes ला घेऊन जाता आली याचा प्रचंड आनंद असतानाच यावर्षीच्या Cannes च्या निमित्ताने माझ्या गावच्या जिवाभावाच्या मैत्रिणींनी खूप मायेने मला भेट दिलेली ही साडी फेस्टिव्हलच्या शेवटच्या दिवशी मी जणू मोरपिसा सारखी पांघरूणच घेतली.
मागच्या वर्षी Cannes मधून पुन्हा आले तेव्हा अनेक जवळच्या माणसांनी प्रेमाने – आपुलकीने माझा सत्कार केला. पण, हा सत्कार माझ्यासाठी खास यासाठी होता की या सगळ्याजणींनी आपल्या रोजच्या धावपळीच्या जगण्यातून वेळ काढून आजवरचा त्यांनी केलेला पहिला सत्कार होता. त्यामुळे माझ्याबरोबर त्यांनीही तो इतका दिलखुलासपणे साजरा केला. त्यांचा आनंद… त्यांच्या मनमुराद नाचण्यात – बागडण्यात आणि धिंगाणा घालण्यात दिसत होता.
आपली माणसं – त्यांचं प्रेम आणि त्यातून मिळणारी आपलेपणाची ऊब याचे मोल सातासमुद्रापार देखील अमूल्यच असते.
“गो! तुम्ही दिलेली साडी नेस्हान. आईची नथ नाकात घालून आणि तिचेच कानातले घालून कान्सच्या समुद्रार लय मिरवलय.”
दरम्यान, आयुष्यात एवढी मोठी संधी मिळाल्यावर छाया कदम यांनी आपल्या गावच्या मैत्रिणींनी दिलेली साडी नेसली, आपलं मूळ गाव-संस्कृती याचा सन्मान केला याबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.