Dashavatar Box Office Collection Day 3 : दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘दशावतार’ सिनेमा १२ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. १२ तारखेला एकाच दिवशी ‘दशावतार’सह ‘बिन लग्नाची गोष्ट’, ‘आरपार’ हे तीन सिनेमे प्रदर्शित झाल्याने बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. दोन दिवसांच्या कलेक्शनची आकडेवारी पाहता सध्या ‘दशावतार’ चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय.

कोकणच्या लाल मातीतील कला आणि कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका निष्ठावंत कलाकाराचा अवतार या ‘दशावतार’ सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. वयाच्या ८० व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर या सिनेमात बाबुली मिस्त्रीची भूमिका साकारत आहेत. याशिवाय सिनेमाच्या सिनेमॅटोग्राफीचं विशेष कौतुक सर्वत्र करण्यात येत आहे.

सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार’ सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ५८ लाख जमावल्याचं वृत्त ‘सॅकनिल्क’ने दिलं आहे. तर, दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ होऊन ‘दशावतार’ने १.३९ कोटींचा गल्ला जमावला आहे.

यामुळे जगभरात या ‘दशावतार’ सिनेमाची दोन दिवसांची एकूण कमाई २.२ कोटींच्या घरात जाऊन पोहोचली आहे. गेल्या काही महिन्यांत प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमांच्या तुलनेत हे कलेक्शन खूपच चांगलं आहे. याशिवाय ‘दशावतार’ची क्रेझ पाहता रविवारी या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ‘दशावतार’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं, या सिनेमाचं लेखन व दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलं आहे. तर ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर या कलाकारांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.

‘दशावतार’ या चित्रपटाच्या माध्यमातून लेखक व दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी कोकणात खदखदत असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला आहे. या चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर बरोबरच सुजय हांडे, ओंकार काटे, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितिन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे आणि विनायक जोशी यांनी केली आहे. अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहेत.