Dilip Prabhavalkar Talk About Dashavatar Underwater Scenes : सध्या सर्वत्र ‘दशावतार’ या सिनेमाची चर्चा सुरू आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. ‘दशावतार’मधला बाबुली मेस्त्री प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे. ‘दशावतार’मधून ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकरांनी पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. बाबुली मेस्त्री या भूमिकेसाठी त्यांनी केलेली मेहनत ‘दशावतार’मधून पाहायला मिळत आहे.
वयाच्या ८१ व्या वर्षी दिलीप प्रभावळकर यांनी फक्त अभिनयच नाही, तर अनेक ॲक्शन सीन्सद्वारे प्रेक्षकांना चकित केलं आहे. विविध प्रकारच्या वेशभूषा आणि कोकणातल्या आव्हानात्मक लोकेशन्सवर जात दिलीप प्रभावळकरांनी दशावतारचं चित्रीकरण केलं आहे. या सिनेमात त्यांनी एक अंडरवॉटर सीनसुद्धा केला आहे, ज्यामुळे अनेक जण दिलीप प्रभावळकरांचं कौतुक करीत आहेत.
‘दशावतार’मधला हा अंडरवॉटर सीन कसा शूट झाला? याबद्दल दिलीप प्रभावळकरांनी नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं आहे. सामला दिलेल्या मुलाखतीत दिलीप प्रभावळकरांनी अंडरवॉटर सीनबद्दल सविस्तरपणे सांगितलं. ते म्हणाले, “सुबोध खानोलकरच्या ‘दशावतार’ या सिनेमासाठी आणि त्यातल्या बाबुली मेस्त्री या भूमिकेसाठी मी काहीही करायला तयार होतो. मला स्वत:ला स्विमिंग येतं, पण अर्थात ते स्विमिंग टँकमध्ये… एखाद्या समुद्रात वगैरे मला पोहता येत नाही. पण, पोहण्याचा अनुभव असल्यामुळे मला असं वाटलं की मी हे करू शकेन. मला तो एक आत्मविश्वास होता.
यापुढे दिलीप प्रभावळकर सांगतात, “तुमच्याकडे एखाद्या गोष्टीचं कौशल्य असेल, तर ते कौशल्य नसल्याचा अभिनय हा जास्त परिणामकारकपणे करता येतो. म्हणजे एखाद्या गोष्टीवर नियंत्रण असेल; तर ते नसल्याचा अभिनय तुम्हाला सहज करता येतो. यामुळे मी खाडीतलं पाणी, खोल पाणी, उथळ पाणी, नदीतलं पाणी अशा सगळ्यात पोहू शकलो.”
अंडरवॉटर सीनचा अनुभव सांगताना दिलीप प्रभावळकर म्हणाले, “अंडरवॉटरचे सीन करताना कॅमेरामनसुद्धा पाण्यात कॅमेरा घेऊन येत होता. त्याला श्वास घेण्यासाठी एक पाईप त्याच्या तोंडाला लावला होता, या सीनचे आम्ही पाच-सहा टेक घेतले. एका टेकनं दिग्दर्शक सुबोधचं समाधान झालं नाही, त्यामुळे पाच-सहा वेळा श्वास कोंडून, मग पुन्हा पाण्यात जाऊन तो सीन तसा शूट केला गेला. पण, यासाठी अर्थात पूर्ण टीमचं सहकार्य असतंच. प्रोडक्शनच्या टीमनं या सीनसाठी माझी योग्य ती काळजी घेतली.”
दरम्यान, १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला ‘दशावतार’ सिनेमा चौथ्या आठवड्यातही अगदी उत्तम सुरू आहे. महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरातून सिनेमाला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळत आहे. या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांच्यासह महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, आरती वडगबाळकर हे कलाकार मुख्य भूमिकांत आहेत.