Girija Oak reveals incident of local train: लोकप्रिय मराठी अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले लवकरच थेरपी शेरपी या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच तिने ‘द लल्लनटॉप’ला मुलाखत दिली.
या मुलाखतीत तिचा साधेपणा आणि सुंदरतेबरोबरच तिचे बोलणे प्रेक्षकांना भावले. या मुलाखतीनंतर अभिनेत्री नॅशनल क्रश म्हणून ओळखली जात आहे.
याच मुलाखतीत अभिनेत्रीने लोकल ट्रेनमध्ये अनेकदा मुलींची छेड काढली जाते असे वक्तव्य केले. याबरोबरच एकदा तिच्याबरोबर लोकल ट्रेनमध्ये काय घडले होते हेही सांगितले.
“तोपर्यंत तो मुलगा…”
अभिनेत्री म्हणाली, “लोकल ट्रेनमध्ये लोक तुम्हाला स्पर्श करून, तुम्हाला धक्का देऊन निघून जातात, या गोष्टी सामान्य झाल्या आहेत. ही फार दु:खाची गोष्ट आहे. अशा गोष्टींमुळे तुम्हाला कायमच सतर्क राहावे लागते. माझ्याबाबतीतसुद्धा अशीच एक घटना घडली होती. एक मुलगा माझ्याजवळ आला, पण तो कधी आला, कुठून आला मला समजले नाही. त्याने त्याचे बोट माझ्या पाठीवर फिरवले. माझ्या मानेपासून ते पाठीपर्यंत त्याने बोट फिरवले आणि त्यानंतर त्याने लगेच तोंड वळवले. जोपर्यंत मला समजले की काय झाले आहे, तोपर्यंत तो मुलगा गायब झाला होता. मी त्याला ओळखू शकले नाही.
याच मुलाखतीत गिरिजाने ती शाळेत असतानाचा एक प्रसंग सांगितला. ती म्हणाली की एक मुलगा सतत त्रास द्यायचा. मी त्याला कानाखाली मारली होती. त्या अनुभवानंतर मी स्वत:साठी उभी राहू लागले. माझ्या घरातील महिलांनी विशेषत: माझ्या आईने मला कायमच खंबीर राहण्यास शिकवले आहे, प्रेरित केले आहे.
“त्यांनी कायमच अशा प्रसंगाचा खंबीरपणे सामना…”
अभिनेत्री म्हणाली, “मी खूप नशिबवान आहे. माझी आजी, आई यांच्यापुढे मी मोठी झाले. त्यांनी कायमच अशा प्रसंगाचा खंबीरपणे सामना केला आहे. मी लहान असताना माझी आई मारामारी करायची हे मी पाहिले आहे. जर तिला कोणी मुद्दाम धक्का दिला किंवा कोणी चुकीच्या पद्धतीने पुढे जाताना दिसले, तेव्हा ती त्या प्रसंगांना कशी सामोरी जायची हे मी पाहिले आहे. गर्दीच्या ठिकाणी लोक तुम्हाला धक्का देतात, स्पर्श करतात, असे अनेक प्रसंग घडताना दिसतात.
माझी आई पटकन मागे वळायची, त्या व्यक्तीची कॉलर पकडायची. सार्वजनिक ठिकाणी मी नेहमीच तिचा तो स्वभाव पाहिला आहे. ती किती सतर्क आणि जागरूक असायची हे मी पाहिले आहे. काही घडलेच नाही अशी ती कधीही वागायची नाही.
दरम्यान, थेरपी शेरपी या वेब सीरिजमध्ये नेहा धुपिया, गुलशन देवैश हे कलाकारदेखील दिसणार आहेत.
