Kshitee Jog and Hemant Dhome’s new film: गेल्या काही वर्षांत हेमंत ढोमेने अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता अशी ओळख निर्माण केली आहे. ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’, ‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटांचे दिग्दर्शन हेमंत ढोमेने केले आहे.
तसेच, ‘ऑनलाइन बिनलाइन’, ‘पोश्टर गर्ल’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘चोरीचा मामला’, ‘हिरकणी’, ‘बस स्टॉप’ अशा चित्रपटांत त्याने अभिनयही केला आहे. ‘फसक्लास दाभाडे’च्या यशानंतर हेमंत ढोमे व क्षिती जोग पुन्हा एकदा एका नवीन चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
नुकताच त्यांच्या नवीन चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. या क्षणाचे फोटो हेमंतने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आदिती तटकरेदेखील दिसत आहेत.
मुहूर्त लिहिलेल्या पाटीवर क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम असे लिहिल्याचे दिसत आहे, तर या चित्रपटाची निर्माती क्षिती जोग आहे. सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी हेमंत ढोमेची आहे.
हेमंत ढोमे काय म्हणाला?
नवीन चित्रपटाचे फोटो शेअर करताना हेमंत ढोमेने लिहिले, “चला आता मराठी शाळा पुन्हा भरणार. आपल्या नव्या चित्रपटाचा मुहूर्त महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री मा. अदितीताई तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाला.”
पुढे हेमंत ढोमेने लिहिले की, क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ लवकरच तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. गणपती बाप्पा मोरया!ही पोस्ट शेअर करताना हेमंत ढोमेने क्षिती जोग व चलतचित्र मंडळाला टॅग केले.
हेमंत ढोमे म्हणाला, ”आज मी जे काही आहे, ते माझ्या मराठी शाळांमुळेच आहे. मातृभाषेतून शिकताना मला माझी संस्कृती, परंपरा आणि माणसं समजली. पण आज मराठी शाळा कमी होत चालल्या आहेत ही चिंतेची बाब आहे. या चित्रपटातून मातृभाषेतून होणारे शिक्षण कमीपणाचं नसून खऱ्या अर्थाने समृद्ध करणारं आहे, हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न असेल. मुहूर्ताला मा. आदिती तटकरे यांसारख्या समाजभान असलेल्या लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळणे ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.”
हेमंतच्या या पोस्टवर मुग्धा कर्णिक, ललित प्रभाकर, क्रांती रेडकर, मुग्धा गोडबोले-रानडे अशा कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. चाहत्यांनीदेखील शुभेच्छा दिल्याचे कमेंट्समध्ये दिसत आहे.
हेमंतबरोबरच आदिती तटकरे यांनीदेखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी चित्रपटाच्या मुहूर्ताचे फोटो शेअर करत लिहिले, “आपल्या प्रत्येकाच्या जडणघडणीत आपल्या शाळेचे मोठे योगदान असते आणि त्यातही मराठी माध्यमाच्या शाळा म्हणजे आपल्या मनावर मायबोलीचे संस्कार करणारे ज्ञानमंदिरच असते.”
“सद्यस्थितीवर मार्मिक पद्धतीने भाष्य करणाऱ्या ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ या मराठी चित्रपटाचा मुहूर्त सोहळा अलिबाग येथे पार पडला. या चित्रपटाचे चित्रीकरण अलिबाग, नागाव, चौल-रेवदंडा, मुरुड-जंजिरा या परिसरात होत आहे याचा विशेष आनंद व अभिमान वाटतो.”
“दिग्दर्शक हेमंत ढोमे व निर्मात्या क्षिती जोग हे नेहमीच समाजाला आरसा दाखवणारे, आशयसंपन्न चित्रपट आपल्यासाठी घेऊन येत असतात. हा नवीन चित्रपटही असाच मनाला स्पर्श करणारा ठरेल हा मला विश्वास आहे. खूप खूप शुभेच्छा!”
आता या चित्रपटात कोणते कलाकार दिसणार, चित्रपटात काय नवीन पाहायला मिळणार, तसेच हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.