Mahesh Manjrekar Punha Shivaji Raje Bhosale Update : मराठीसह हिंदी सिनेविश्वात आपल्या सिनेमांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते म्हणजे महेश मांजरेकर. काही दिवसांपूर्वी महेश मांजरेकर यांनी महाराष्ट्रातील सिनेरसिकांना खास भेट दिली होती, ती म्हणजे त्यांच्या आगामी ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या सिनेमाची.

महाराष्ट्र दिनी ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. यानंतर सिनेमाचा खास टीझर प्रेक्षकांसमोर आणला होता. सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच चाहत्यांना ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या सिनेमाची उत्सुकता लागून राहिली होती.

येत्या दिवाळीत हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता, मात्र आता या सिनेमाबाबत एक अपडेट समोर येत आहे. ती म्हणजे हा सिनेमा दिवाळीत प्रदर्शित न होता पुढे काही महीने लांबणीवर गेला आहे.

Pinkvilla च्या वृत्तानुसार, महेश मांजरेकरांचा ‘पुन्हा शिवाजी राजे भोसले’ हा बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट येत्या दिवाळी २०२५ मध्ये प्रदर्शित न होता पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे दिवाळी ऐवजी हा सिनेमा आता पुढील वर्षी म्हणजेच १ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. याबाबतचं अधिकृत कारण अद्याप समोर आलेलं नाही.

‘पुन्हा शिवाजी राजे भोसले’बाबत सांगायचं झाल्यास, यात अभिनेता सिद्धार्थ बोडके, सयाजी शिंदे, त्रिशा ठोसर, भार्गव जगताप, विक्रम गायकवाड, मंगेश देसाई, शशांक शेंडे, संदीप जुवाटकर आणि इतर अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.

‘पुन्हा शिवाजी राजे भोसले’ या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांनी केलं असून, निर्मितीची धुरा राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध यांनी सांभाळली आहे. तर संगीत व पार्श्वसंगीताची जबाबदारी हितेश मोडककडे आहे.

दरम्यान, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ नंतर प्रेक्षकांना ‘पुन्हा शिवाजी राजे भोसले’ या सिक्वेलकडून खूप अपेक्षा आहेत. आजच्या काळात मराठी अस्मितेवर नव्याने भाष्य करणारा हा चित्रपट आता २०२६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.