Mahesh Manjrekar : मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर सध्या त्यांच्या ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या सिनेमामुळे चर्चेत आहेत. हा सिनेमा येत्या ३१ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. सध्या मांजरेकर या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. यादरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी बाळासाहेब ठाकरेंबद्दलची एक आठवण सांगितली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
महेश मांजरेकर यांनी नुकतीच ‘झी २४ तास’ वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी ते बाळासाहेब ठाकरे यांची आठवण सांगत म्हणाले, “बाळासाहेबांना मी फार आवडायचो. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ हा चित्रपट त्यांनी कमीत-कमी ७० वेळा तरी पाहिला असेल. मी त्यांच्याकडे कधीही गेलो, तरी ते मला त्यांच्याकडे असलेली या चित्रपटाची डीव्हीडी दाखवायचे.”
मांजरेकर पुढे म्हणाले, “मी एकदा त्यांच्या घरी गेलो होतो. रात्रीची वेळ होती…त्यांनी मला बसायला सांगितलं आणि म्हणाले तू मला शिवसेनेत हवा आहेस. मी घाबरलोच! त्यावेळी त्यांची विक्रोळीत सभा होती…ते म्हणाले त्यावेळी तू हवास. त्यांचं बोलणं ऐकून माझे पाय लटपटायला लागले होते. त्यांना मी बोललो…नाही ओ मी राज ठाकरेचा मित्र आहे. हे मी बोललो आणि तिथून निघालो. बाहेर पडल्यावर मला राज ठाकरेंचा फोन आला होता. पण, मातोश्रीसमोर तेव्हा माझे इतर काही मित्रही बरोबर होते म्हणून मी त्याचा फोन उचलू शकलो नव्हतो. आता राज माझा खरंच खूप चांगला मित्र आहे…त्यामुळे मी कसा जाईन. त्यानंतर घरी आल्यावर मी फोन बंद ठेवला होता आणि झोपून गेलो. तीन दिवस तरी फोन बंद होता.”
दरम्यान, काही वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत मांजरेकरांनी राज ठाकरे व त्यांच्या मैत्रीबद्दल सांगितलं होतं. ते म्हणाले होते, “राजसारखा मित्र कुठेही भेटणार नाही. अडचणींच्या काळात तो मदतीसाठी सदैव तत्पर असतो. माझ्यापासून एक फोन लांब असलेली व्यक्ती म्हणजे राज ठाकरे…तो खऱ्या अर्थाने दिलदार मनाचा माणूस आहे. मी त्याला राजा म्हणतो आणि त्याने तेवढा हक्क मला दिला आहे.”
महेश मांजरेकरांच्या ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या सिनेमाबद्दल सांगायचं झालं, तर हा सिनेमा ३१ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये सिद्धार्थ बोडके, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप यांच्यासह बालकलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
