Mahesh Manjrekar On Marathi Movie : मराठी मनोरंजन सिनेसृष्टीतील सध्याचे आघाडीचे निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते म्हणजे महेश मांजरेकर. ‘शिक्षणाच्या आयचा घो’, ‘पांघरूण’, ‘दे धक्का’, ‘नटसम्राट’, ‘काकस्पर्श’ यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय, दिग्दर्शन व निर्मिती करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. केवळ मराठीचं नव्हे तर हिंदी चित्रपटांमधूनही त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

नुकताच त्यांचा ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि या सिनेमातून त्यांनी शेतकरी आत्महत्येसारखा गंभीर विषय प्रेक्षकांसमोर आणला आहे. याचनिमित्ताने ते अनेक ठिकाणी मुलाखती देत आहेत. अशातच नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी ४५० कोटींचा सिनेमा करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

‘तारांगण’ला दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकर म्हणाले, “आपल्याकडे मराठीत विषय चांगले आहेत, त्यामुळे एखादा चांगला विषय आणि जास्तीचं बजेट असलेला सिनेमा होईल तेव्हा आपण नक्कीच चारशे-पाचशे कोटींचा सिनेमा करू शकतो. तुम्हाला चारशे-पाचशे कोटींमध्ये पोहोचायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण देशभरात पोहोचावं लागेल.”

‘कांतारा’ फक्त कन्नडमध्ये असता तर…”

यानंतर त्यांनी दाक्षिणात्य हिट सिनेमांचं उदाहरण देत म्हटलं, “‘कांतारा’ फक्त कन्नड भाषेत असता तर त्या सिनेमाने इतकी कमाई केली नसती. पण, ‘कांतारा’, ‘केजीएफ’ किंवा ‘केजीएफ २’सारखे सिनेमे पूर्ण देशभरात प्रदर्शित झाले, त्यामुळेच ते कोटींची कमाई करू शकले; त्यामुळे आपल्यालाही देशभरात प्रदर्शित होणारा आणि सगळ्या भाषेत रिलीज होणारा सिनेमा करावा लागेल.”

“मी ४५० कोटींचा सिनेमा करणारच…”

यानंतर ते म्हणतात, “मी एक असा सिनेमा करेन, जो ४५० कोटींचा व्यवसाय करेल आणि तो वाजेल. मी एक मोठा टॉर्च घेऊन निर्मात्याला शोधत आहे, कारण तो सिनेमा किमान १०० कोटींचा तरी असला पाहिजे. सगळ्याचं सोंग आणता येतं; पण पैशांचं सोंग आणता येत नाही, त्यामुळे मला एखादा निर्माता असा भेटला पाहिजे जो म्हणेल की, हे १०० कोटी घे आणि कर सिनेमा. तो एक विश्वास पाहिजे. मग मी दाखवून देईन की आपण काय करू शकतो.”

दरम्यान, महेश मांजरेकरांचा आगामी ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा सिनेमा येत्या ३१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला असून यात त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप हे बालकलाकार मुख्य भूमिकांत आहेत. अभिनेता सिद्धार्थ बोडकेनं यात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तसंच यात विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने आणि सयाजी शिंदे हे मुख्य भूमिकांत आहेत.