Pooja Sawant Dance Video: पूजा सावंतने ‘दगडी चाळ’, ‘बोनस’, ‘जंगली’, ‘बाली’, ‘भेटली तू पुन्हा’, ‘विजेता’, ‘वृंदावन’ अशा अनेक चित्रपटांत काम केले आहे. तिच्या भूमिकांतून आणि अभिनयातून तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
अभिनेत्री सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. फिरायला गेल्याचे, तिच्या खासगी तसेच व्यावसायिक आयुष्याविषयी माहिती देणारे अनेक व्हिडीओ, फोटो, पोस्ट ती शेअर करत असते. तिच्या व्हिडीओंना मोठा प्रतिसाद मिळतो. तिचे दोन दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
पूजा सावंतने सांगितली १३ वर्षांपूर्वीची आठवण
आता पूजा सावंतने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा तिच्या एका सादरीकरणाचा व्हिडीओ आहे. ‘आईचा जोगवा मागेन’ या गाण्यावर तिने सुंदर सादरीकरण केले होते. देवीची विविध रुपे या नृत्यातून पाहायला मिळत आहे. पूजाचे हावभाव लक्षवेधी ठरत आहेत.यामध्ये तिने हिरवी साडी नेसल्याचे दिसत आहे. हातात हिरव्या बांगड्या, कपाळाला कुंकू त्यात हळदीचा टिळा, नाकात नथ, मोकळे केस असा तिचा लूक लक्ष वेधून घेत आहे.
तिने हा व्हिडीओ शेअर करताना तिने एक जुनी आठवण लिहिली, “१३ वर्षांपुर्वी ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमात जोगवा करण्याची संधी मिळाली होती. त्यासाठी केदार सरांचे आभार मानावे तितके कमीच आहेत.”
पुढे तिने केदार शिंदेंना टॅग करत लिहिले की अशी संधी भाग्यानेच मिळते. तसेच तिने नृत्यदिग्दर्शनाबद्दल माहिती देत लिहिले की चारुशीला ताईने ह्याचं नृत्यदिग्दर्शन केलं होतं. शेवटी पूजाने ते दिवस मंतरलेले होते, असे लिहित मनातील भावना व्यक्त केल्या. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांनी पूजाचे कौतुक केले आहे.
नेटकरी काय म्हणाले?
एकाने लिहिले, “मनाला आनंद आणि शांती देणारे गाणे आहे. हा परफॉर्मन्स मी नेहमीच पाहत असते”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “मी आताही महाराष्ट्राची लोकधारा पाहत असतो”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “काही भूमिका विशिष्ट कलाकारच अजरामर करू शकतात. पुन्हा पुन्हा पहावं असं गाणं आहे. पुन्हा एकदा नव्याने सुरुवात कर. निळकंठ मास्तर, लपाछपी मधील भूमिकांसारख्या भूमिका परत कर. शुभेच्छा”, एका नेटकऱ्यान लिहिले, “हा खूप जुना व्हिडीओ आहे. मस्त”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहे.
आता आगामी काळात अभिनेत्री कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.