अभिनेता चिन्मय मांडलेकर सध्या त्याच्या मुलाच्या नावामुळे खूप चर्चेत आला आहे. मुलाचं नाव ‘जहांगीर’ ठेवल्यामुळे त्याला व त्याच्या कुटुंबियांना ट्रोल केलं जात आहे. ‘भारत सोडून जा’, ‘अफगाणिस्तान किंवा पाकिस्तानात राहायला जा’, असे मेसेज ट्रोलर्स त्यांना करत आहेत. त्यामुळे या ट्रोलिंगला संतापून चिन्मय मांडलेकरनं एक मोठा निर्णय घेतला. यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका न करण्याचा निर्णय चिन्मयनं घेतला. पण अभिनेत्याच्या या निर्णयानंतर इतर मराठी कलाकारांनी चिन्मयला पाठिंबा देत तीव्र संताप व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, गौतमी देशपांडे, सिद्धार्थ चांदेकर, रवी जाधव, अक्षय वाघमारे, समीर विद्वंस अशा अनेक कलाकारांनी चिन्मयच्या निर्णयानंतर सोशल मीडियावर स्वतःची परखड मतं मांडली. ‘याच पद्धतीनं कलाकारांना वागणूक द्यायला हवी का? असं सॉफ्ट टार्गेट बनवायचं असेल तर लोकांची लायकी नाही काही चांगलं मिळवण्याची. यामुळे मी अत्यंत निराश झालेय. हे असं व्हायलाच नाही पाहिजे. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत चिन्मय दादा!’, असं लिहित गौतमीनं इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली होती. तसंच समीर विद्वंस म्हणाले होते, “चिन्मय एक मित्र म्हणून, कलाकार म्हणून विनंती करतो की, हा निर्णय मागे घे आणि ज्या श्रद्धेने तू महाराजांची भूमिका करतोस ती करत राहा!” चिन्मयच्या निर्णयावर मराठी कलाकारांच्या अशा प्रतिक्रिया अजून येत आहेत. अशातच ज्येष्ठ अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी इन्स्टाग्रामवर मार्मिक पोस्ट केली आहे.

हेही वाचा – ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर लवकरच येतेय आणखी एक नवी मालिका, आर्या आंबेकर व नचिकेत लेले यांनी गायलं शीर्षकगीत

सुप्रिया पिळगावकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. एखाद्या चित्रपटाविषयी किंवा चालू घडामोडीविषयी परखड मत व्यक्त करत असतात. नुकतीच त्यांनी चिन्मय मांडलेकरच्या लेकाच्या नावावरील ट्रोलिंगवर मोजक्या शब्दांत लिहिलेली मार्मिक पोस्ट शेअर केली आहे. सुप्रिया यांनी लिहिलं आहे, “जहांगीर मांडलेकर! तुला अनेकानेक शुभ आशीर्वाद!”

हेही वाचा – Video: जबरदस्त डान्स अन् बरंच काही…; ‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिनेत्याचा ‘असा’ पार पडला साखरपुडा, पाहा पहिला व्हिडीओ

‘जहांगीर’ नावाचा अर्थ

दरम्यान, चिन्मय मांडलेकरची पत्नी नेहा जोशी-मांडलेकरनं तिच्या व्हिडीओमध्ये लेकाच्या ‘जहांगीर’ नावाचा अर्थ सांगितला होता. ती म्हणाली होती, “माझ्या मुलाचं नाव ‘जहांगीर’ आहे. ‘जहांगीर’ हे पर्शियन नाव आहे. माझ्या मुलाचा जन्म २१ मार्च २०१३ला झाला होता. २१ मार्चला जमशेदी नवरोज असतो. त्या जमशेदी नवरोज दिवशी त्याचं नाव ‘जहांगीर’ (Jehangir) असं ठेवलं गेलं. नाव कोणावरून ठेवलं? कसं ठेवलं? तो मुद्दा नंतर येतो. मुळात या नावाचा अर्थ फार सुंदर आहे. ‘जहांगीर’ म्हणजे जगज्जेता. जग जिंकलेला ‘जहांगीर’. तर मला माहित नाही इतर माणसं आपल्या मुलाची नावं कशी ठेवतात. मी तरी माझ्या दोन्ही मुलांची नाव त्या नावाचा अर्थ फार गोड आहे, म्हणून ठेवली आहेत. शिवाय भारतरत्न जेआरडी टाटा यांचं नावही ‘जहांगीर’ आहे. टाटा कुटुंब माझ्यासाठी आणि माझ्या नवऱ्यासाठी प्रेरणादायी कुटुंब संस्था आहे. त्यामुळे ‘जहांगीर’ या नावाचा अर्थ आवडला.”

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress supriya pilgaonkar react on chinmay mandlekar getting trolled for his son name jehangir pps
Show comments