Mrinal Kulkarni Son Virajas Kulkarni : मृणाल कुलकर्णींना सिनेविश्वाच्या ‘सोनपरी’ म्हणून ओळखलं जातं. आजवर त्यांनी अनेक मराठी सिनेमे, नाटक आणि मालिकांमध्ये काम केलेलं आहे. काही वर्षांपूर्वी मृणाल कुलकर्णींचा लेक विराजसने सुद्धा आईच्या पावलांवर पाऊल टाकत मालिकाविश्वात पदार्पण केलं. मात्र, एक मालिका करून तो पुन्हा रंगभूमीकडे वळला.
विराजसने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा मार्ग निवडला असला तरीही त्याचा या क्षेत्रातील प्रवास स्वतंत्र आहे, त्याने त्याची ओळख खूप आधीपासून स्वत: निर्माण केली असल्याचं मृणाल कुलकर्णींनी सांगितलं. त्या कांचन अधिकारी यांच्या ‘बातों बातों में’ पॉडकास्टमध्ये बोलत होत्या.
मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, “माझे आजोबा गो. नी. दांडेकर यांच्यातले लेखनगुण विराजसमध्ये आलेले आहेत असं मला वाटतं. विराजसचा कल पहिल्यापासून हा लेखनाकडेच होता. जेव्हा त्याने पहिल्यांदा मला या क्षेत्रात यायचंय असं सांगितलं तेव्हा मला वाटलं तो अभिनयाकडेच वळणार आणि फारतर दिग्दर्शन करेल. पण, त्याने मला लेखनात पुढे काम करायचंय असं सांगितलं. तेव्हा मला इतका आनंद झाला की मी सांगूही शकत नाही.”
अभिनेत्री पुढे म्हणाल्या, “व्हिसलिंग वुड्समध्ये त्याने लेखन आणि दिग्दर्शनाचा अभ्यास केला. त्यामुळे त्याला ‘स्व’ची ओळख झाली. वयाच्या १९ वर्षी त्याने पहिलं इंग्रजी नाटक लिहिलं. ते दिग्दर्शित केलं, त्यात काम केलं. ते नाटक खूप सुपरहिट झालं. ‘Anathema’ असं त्या नाटकाचं नाव आहेत. या नाटकाला अनेक पुरस्कार मिळाले. यानंतर त्याने पुण्यात संस्था सुरू केली. त्या संस्थेतील सगळी मुलं उत्तम काम करत आहेत. शिवराज वायचळ, क्षितीश दाते, सूरज पारसनीस…असे अनेक कलाकार या संस्थेत होते. विराजस मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये लिहितो…आणि त्याच्या तिन्ही भाषांमधील कलाकृतींचं कौतुक झालंय. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.”
“हा प्रवास त्याने स्वत: केलेला आहे. म्हणजे बहुतांश वेळा कसं होतं, मी अभिनेत्री आहे…म्हणून माझ्या मुलाला चार लोक बघणार, त्याला विचारणार मग तो काम करणार. पण, विराजसच्या बाबतीत असं झालं नाही. त्याने स्वत: काम करून नाव मिळवलं. रंगभूमीवर काम करून अलीकडच्या काळात त्याने मालिका केली. पण, एकच मालिका करून तो थांबला…तिथेही आपण काय केलं पाहिजे, स्वत:चा मार्ग काय असावा हे त्याला खूप लवकर समजलं. पुढे तो मालिकांमध्ये कामही करेल पण, नाटक हे त्याचं कायम पहिलं प्रेम राहील.” असं मृणाल कुलकर्णी यांनी सांगितलं.