Mrinal Kulkarni Post For Shivani Rangole : मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे या सासू-सुनेची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. या दोघींनी काही प्रोजेक्ट्समध्ये एकत्र काम देखील केलेलं आहे. त्यामुळे शिवानी प्रेमाने आपल्या सासूबाईंना ‘ताई’ म्हणते. ‘विराजसचं लग्न झाल्यावर आमच्या घरी सून नव्हे, तर आमची मुलगी आली’ असं मृणाल कुलकर्णी कायम सगळ्या मुलाखतींमध्ये सांगतात. या दोघींचं बॉण्डिंग पाहून सगळेजण सासू किंवा सून हवी तर तशी असं आवर्जून म्हणतात.

शिवानी रांगोळे आज तिचा ३० वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने तिच्या सासूबाई मृणाल कुलकर्णींनी खास पोस्ट शेअर केली आहे. “भरपूर काम कर…खूप मोठी हो! या क्षेत्रात भरपूर यश मिळव मात्र, तुझ्या चेहऱ्यावरचं गोड हसू कायम असंच राहुदेत” असा मोलाचा सल्ला सासूबाईंनी वाढदिवसानिमित्त शिवानीला दिला आहे. त्या नेमकं काय म्हणाल्या आहेत जाणून घेऊयात…

मृणाल कुलकर्णी लिहितात, “प्रिय शिवानी…एखादी वाऱ्याची झुळूक यावी तशी तू आमच्या आयुष्यात आलीस… तुझं खळाळून हसणं, जरा वेळ मिळाला की “घर-घर” खेळणं, घरातल्या सगळ्यांची काळजी घेणं, तुझी गोड चिवचिव आणि मुख्य म्हणजे मी जास्त उद्योग केले की मलादेखील दटावणं… हे सगळंआम्हाला फार फार आवडतं…’तुला शिकवीन चांगलाच धडा’नंतर मिळालेला हा ब्रेक तू छान एन्जॉय केलास. तू आपल्या कुटुंबाशी एकरूप झाली आहेस हे पाहून खूप बरं वाटतं… “कोहम” या गोनिदांच्या कादंबऱ्यांवर आधारित नाट्यमय अभिवाचनासाठी तुझं भरपूर कौतुक होत आहे याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. आता तुझं नवं नाटक येणार. “शंकर _जयकिशन” भरत जाधव आणि महेश मांजरेकर या दिग्गज कलावंतांबरोबर तू तशीच ताकतीने उभी राहशील यात आम्हाला बिलकुल शंका नाही. भरपूर कष्ट कर, मोठी हो! पण तुझ्या चेहऱ्यावरचं गोड हसू असंच राहुदेत… आम्हाला आमच्या सुनेकडून मिळतंय तसंच सुख तुझ्या आईबाबांना त्यांच्या जावयाकडून देखील मिळेल याची खात्री आहे मला!! तुम्हा दोघांनाही खूप खूप प्रेम…”

मृणाल कुलकर्णी यांनी शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करत सासू-सुनेच्या या गोड नात्याचं कौतुक केलं आहे. तसेच या दोघींच्या नात्याला कधीच कुणाची नजर लागू नये असंही चाहत्यांनी कमेंट्समध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, शिवानीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, लवकरच ती ‘शंकर जयकिशन’ या नाटकात झळकणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या नाटकाच्या निमित्ताने शिवानीला भरत जाधव व महेश मांजरेकर यांसारख्या दिग्गजांबरोबर काम करायला मिळणार आहे. हे नाटक लवकरच रंगभूमीवर येईल अशी पोस्ट काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केली होती.