Marathi actor on rejecting Bigg Boss: ‘बिग बॉस’ हा सर्वांत लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणून ओळखला जातो. विविध भाषांमध्ये हा शो प्रदर्शित होतो. दरवर्षी या शोमध्ये विविध क्षेत्रांतील, त्यातही बहुतांशी अभिनय क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकार स्पर्धक म्हणून सहभागी होतात.
या शोद्वारे कलाकार त्यांच्या खऱ्या आयुष्यात कसे आहेत, त्यांचे स्वभाव कसे आहेत. एखाद्या परिस्थितीत ते कसे वागतात, इतरांना ते कशी वागणूक देतात अशा त्यांच्या विविध बाजू प्रेक्षकांना पाहता येतात.
अनेकदा टास्क, तसेच प्रेक्षकांच्या व्होटिंगच्या आधारावर ते या शोमध्ये दीर्घकाळ राहतात. ज्या स्पर्धकाला प्रेक्षकांचे मोठे प्रेम मिळते, जो स्पर्धक त्याच्या खेळातून प्रेक्षकांची मने जिंकतो, तो शो जिंकतो. अशा कलाकारांना पुढे काम मिळण्याची शक्यता वाढते, असे म्हटले जाते.
मराठी भाषेतदेखील ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर आतापर्यंत बिग बॉस मराठीचे पाच सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या शोला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळताना दिसते. आता अभिनेता पार्थ भालेरावने एका मुलाखतीत या शोबद्दल वक्तव्य केले आहे.
अभिनेत्यानं स्पष्टच सांगितलं बिग बॉस नाकारण्याचं कारण
अभिनेता पार्थ भालेरावनं नुकतीच ‘रेडिओ सिटी’ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला विचारलं की, बिग बॉसचं जर नवीन पर्व आलं आणि त्यामध्ये जर जाण्याची संधी मिळाली, तर तू जाशील का? त्यावर अभिनेता म्हणाला, “मी जाणार नाही. त्यांचा मला दरवर्षी फोन येतो आणि मी त्यांना दरवर्षी नाही म्हणतो.”
पुढे अभिनेता म्हणाला, “मला एक तर टेलिव्हिजन फारसं करायला आवडत नाही, हे पहिलं कारण आहे. दुसरं असं की, बिग बॉस हा जो खेळ आहे, त्याची जी पद्धत आहे, ती मला नैतिकदृष्ट्या पटत नाही. तिसरं असं की, ते दरवर्षी असं सांगतात की या वेळेला सगळी नवीन पिढी आहे आणि जेव्हा शो भेटीला येतो, त्यावेळी सगळे ४० वर्षांच्या पुढचे दिसतात. त्यामुळे मला तिकडे तुम्ही का अडकवताय, असं मला वाटतं.”
“मी अलीकडे अनेकदा खूप स्पष्टपणे सांगतो की, मी बिग बॉसला नकार देतो आणि त्यामुळे गेली दोन वर्षं ते मला फोन करत नाहीत.पण, त्यांचे पहिल्या पर्वापासून मला फोन येत होते; पण मी त्यांना नाही असंच सांगतो. मी या क्षेत्रात अभिनय करण्यासाठी आलो आहे. मी त्याव्यतिरिक्त काही करायचं नाही, हे माझं ठरलेलं आहे. “
“मी अभिनय क्षेत्रात हे करण्यासाठी नक्कीच आलो नव्हतो”
बिग बॉसच्या घरात सहभागी होणारे स्पर्धक अभिनय करतात, असं तुला वाटतं का? यावर पार्थ म्हणाला, “मी अभिनय करत नाही, याचा ते अभिनय करतात. ते बोअर आहे. ते स्क्रिप्टेड आहे की नाही, यामध्ये तर मी पडलोच नाही. बिग बॉसमध्ये तुम्ही तुमचं आयुष्य त्यांना दाखवता. रोजच्या आयुष्यात तुम्ही कसे जगता, हे तुम्ही त्यांना दाखवता. त्यामुळे लोक बोलतात.”
“या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्याकडे लक्ष वेधलं जातं. दोन वर्षं प्रत्येक कार्यक्रमाच्या सुपाऱ्या मिळतात. दहीहंडी, गणपतीच्या सुपाऱ्या मिळतात. त्यानंतर तुमच्याकडे कोणी लक्ष देत नाही. तर हा माझ्या अभिनयाचा भाग नाही. मी अभिनय क्षेत्रात हे करण्यासाठी नक्कीच आलो नव्हतो”, असे म्हणत बिग बॉसमध्ये का जाणार नाही, याचं कारण पार्थनं सांगितलं आहे.
दरम्यान, पार्थ भालेराव बॉईजच्या चारही भागांत प्रमुख भूमिकेत दिसला आहे. तसेच लालबागची राणी, बस्ता, गर्ल्स अशा चित्रपटांतून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.