Prajakta Gaikwad Talks About Her In Laws : प्राजक्ता गायकवाड मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती तिच्या ‘स्मार्ट सुनबाई’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. प्राजक्ता खऱ्या आयुष्यातही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अशातच आता तिने तिच्या सासरच्या मंडळींबद्दल सांगितलं आहे.

प्राजक्ता गायकवाड सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. यामार्फत ती तिच्या आयुष्यातील घडामोडी तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते. अशातच तिने तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली आहे. यावेळी तिने तिच्या लग्नाबद्दल आणि सासरच्या मंडळींबद्दल सांगितलं आहे.

प्राजक्ता गायकवाड येत्या २ डिसेंबरला लग्न करणार आहे. लग्नाच्या काही दिवसांआधीच तिचा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने तिला मुलाखतीत याबद्दल विचारल्यानंतर ती म्हणाली, “खरंतर हे सगळं खूप सुदैवाने माझ्याबरोबर घडत आहे. साखरपुड्याच्या आधी या चित्रपटाचं शूटिंग झालेलं आणि आता लग्न होणार असताना चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्या सिनेमाचं शीर्षकही स्मार्ट सुनबाई असं आहे, त्यामुळे सगळं एकाच ठिकाणी येऊन थांबतंय.”

प्राजक्ता पुढे म्हणाली, “माझ्या दृष्टीने स्मार्ट सुनबाई म्हटलं तर समजूतदार असणारी. कुटुंबात सगळेच समजूतदार असायला हवे. माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं. या चित्रपटातून आम्ही चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करत आहोत. नारी शक्तीचा यातून जागर होत आहे.” स्मार्ट सुनबाईबद्दल ती पुढे म्हणाली, ‘खरंतर माझ्यासाठी हे नातं नवीन आहे. माहेर आणि सासर या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल कसा साधायचा हे शिकत आहे.”

सासरच्या मंडळींबद्दल प्राजक्ता गायकवाडची प्रतिक्रिया

प्राजक्ता पुढे सासरच्या मंडळींबद्दल म्हणाली, “माझं तिकडचं कुटुंब खूप छान आहे. मला पाठिंबा आहे त्यांचा. माझ्या करिअरला पाठिंबा देतात ते. त्यांच्या घरात मुलगी नाहीये, त्यामुळे त्यांनी मला आधीच सांगितलं की तू आमच्याकडे सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून येणार आहेस, त्यामुळे मी खूप आनंदी आहे. माझं कुटुंब खूप आनंदी आहे आणि सासरची मंडळीही आनंदी आहेत. आधी चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि त्यानंतर २ डिसेंबरला मी खऱ्या अर्थाने स्मार्ट सुनबाई होणार आहे.”