Prasad Oak on his career: प्रसाद ओक हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. ‘धर्मवीर’, ‘धर्मवीर २’, ‘फर्जंद’, ‘धुरळा’, ‘हिरकणी’ आणि अशा अनेक चित्रपटांमध्ये विविध धाटणीच्या भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. विनोदी, तसेच गंभीर भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
प्रसाद ओक काय म्हणाले?
आता प्रसाद ओक लवकरच वडापाव या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. विशेष म्हणजे हा त्यांचा १०० वा चित्रपट असणार आहे. २ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आता चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी ‘एबीपी माझा’ला मुलाखत दिली.
या मुलाखतीत त्यांनी टीव्ही जाहिरातीत काम करण्याची संधी मिळाली नाही, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
प्रसाद ओक म्हणाले, “माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आहे की किती मालिका, चित्रपटांत मी काम केलं. किती व्यावसायिक नाटकांत काम केलं. एकही कमर्शियल जाहिरात मला आजपर्यंत मिळाली नाही. मी जो आकडा सांगणार आहे, ते ऐकून खोटं वाटेल.”
ते पुढे म्हणाले, “मी जाहिरातींसाठी जवळजवळ पाच ते सहा हजार ऑडिशन दिल्या. पण, मला एकही कमर्शियल जाहिरात मिळाली नाही. बाकी, प्रिंट जाहिरात वगैरे केल्या आहेत. पण, टीव्हीसाठी मला जाहिरात मिळाली नाही.”
याच मुलाखतीत रितिका श्रोत्री आणि गौरी नलावडे यांनीदेखील चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच्या आठवणी सांगितल्या. लंडनमध्ये वडापावला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
वडापाव या चित्रपटात रसिका वेंगुर्लेकर, अभिनय बेर्डे, ऋतिका श्रोत्री असे अनेक कलाकार प्रमुख भूमिकांत दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. आता चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, प्रसाद ओक अभिनयाबरोबरच सोशल मीडियावरदेखील सक्रिय असतात. काही वेळा ते विनोदी रील्सदेखील शेअर करीत असतात. त्यांच्या सोशल मीडियावरील व्हिडीओंना चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो.