Pravin Tarde Video : किल्ले रायगड… छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी. काळाच्या ओघात किल्ल्याची दूरावस्था झाली असली तरी या किल्ल्याबद्दलचं आकर्षण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे, त्यामुळेच शिवप्रेमींबरोबरच अनेक पर्यटक इथे येत असतात. पण, या ठिकाणी अनेकदा पर्यटकांकडून कचरा केला जातो. याबद्दल अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी व्हिडीओ शेअर केला आहे.
रायगडावरील हिरकणी बुरूज, जगदीश्वराचं मंदिर, गंगासागर तलाव, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही आणि अशी काही महत्त्वाची ठिकाणं पाहण्यासाठी पर्यटक येत असतात. पण, काही पर्यटक त्यांचं समाजभान विसरतात आणि गडावर कचरा करून जातात. अशाच काही पर्यटकांनी रायगडावर केलेल्या कचऱ्याचा व्हिडीओ प्रवीण तरडेंनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
प्रवीण तरडेंनी लेखक विश्वास पाटील यांच्याबरोबर रायगडाला भेट दिली, तेव्हा त्यांनी गडाच्या भिंतीमधील भेगांमध्ये कचरा पहिला आणि याबद्दल नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओत प्रवीण तरडे म्हणतात, “मी विश्वास पाटील सरांबरोबर रायगड पाहायला आलो आहे. इथल्या प्रत्येक भिंतीला, दगडाला हात लावताना असं वाटतं की, इथे कधीतरी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्पर्श केला असेल. म्हणजे इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या असण्याचा भास होतो.”
यानंतर प्रवीण तरडे किल्ल्याच्या भिंतीच्या भेगांमधील कचरा (खाऊचे पॅकेट) बाहेर काढून दाखवतात आणि म्हणतात, “ज्याने कुणी हा कचरा इथे असा टाकला असेल, त्या माणसाला मी मनापासून विनंती करतो की, तू पुन्हा रायगडावर येऊ नकोस, ही कचरा टाकायची जागा नाही. इथे आपल्या बापजाद्यांनी इतिहास घडवला आहे, आपलं रक्त सांडलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ही पवित्र भूमी आहे. आजही महाराज इथे आहेत, ते कुठेही गेलेले नाहीत, त्याचं भान ठेवा.”
यानंतर शिवाजी सावंत म्हणाले, “या भूमीला शिवाजी महाराजांचा फक्त स्पर्श नव्हे तर परीस स्पर्श झाला आहे. लोखंडाला स्पर्श केल्यानंतर त्याचं सोनं होतं, तसं छत्रपती शिवाजी महाराजांनी या परिसराचं सोनं केलं आहे.”
पुढे प्रवीण तरडेंनी आवाहन करीत म्हटलं, “इथे जे जे पर्यटक येतात, त्यांना एकच विनंती आहे, आपला रायगड स्वच्छ ठेवा. रस्त्यावर कचरा असेल तर आम्ही उचलू, पण असं दगडांच्या भेगांमध्ये अडकवलेला कचरा कसा बघणार. त्याचं काय करणार आणि हा कचरा शोधून तरी कसा काढणार… आपल्या राजांचा हा किल्ला आहे, राजधानी आहे; त्यामुळे त्याची आपणच काळजी घ्यायला हवी.”
दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी त्यांच्या या कृतीचं कौतुक केलं आहे; तर व्हिडीओखालील कमेंट्समध्ये अनेकांनी रायगडावर कचरा करणाऱ्यांबद्दल संतापही व्यक्त केला आहे.
