अभिनेत्री प्रिया बापट व अभिनेता उमेश कामत पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. तब्बल १२ वर्षांनी ही रिअल लाइफ जोडी सिनेमात एकत्र काम करतेय. त्यांच्या आगामी चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘बिन लग्नाची गोष्ट’ असं या सिनेमाचं नाव आहे.
नात्यांच्या पारंपरिक चौकटींना धक्का देणारा आणि एक नव्या विचारांची झलक देणारा ‘बिन लग्नाची गोष्ट’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा हा टीझर लिव्ह-इन रिलेशनशिपसारख्या आधुनिक संकल्पनेवर आधारित असून, नात्यांची नवीन व्याख्या मनोरंजनात्मकरित्या मांडतो.
चित्रपटाच्या टीझरमध्ये उमेश कामत आणि प्रिया बापट यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. लिव्ह-इनमध्ये राहात असलेल्या या जोडप्याच्या आयुष्यात लग्नाआधीच गरोदरपणाचे वळण येते आणि त्यात एक अनपेक्षित ट्विस्टही दिसतो. याचबरोबर गिरीश ओक आणि निवेदिता सराफ यांचे नातेही पारंपरिक चौकटींपेक्षा काहीसे वेगळे असल्याचे दिसत आहे.
पाहा टीझर
‘बिन लग्नाची गोष्ट’ सिनेमाचे दिग्दर्शन आदित्य इंगळेंनी केले आहे. “प्रेक्षकांकडून टीझरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट एक वेगळी संकल्पना घेऊन येतोय आणि त्यात नात्यांचा भावनिक प्रवास उलगडतो. उमेश आणि प्रिया यांच्या नैसर्गिक अभिनयामुळे ही कथा अधिक वास्तवदर्शी वाटते,” असं आनंद इंगळे म्हणाले.
निर्माते नितीन वैद्य म्हणाले, “चित्रपटाची गोष्ट हटके असली तरी ती आपलेपणाची भावना देणारी आहे. निवेदिता सराफ आणि गिरीश ओक यांसारखे अनुभवी कलाकार या कथेला अधिक भावनिक खोली प्रदान करतात. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच भावेल, असा विश्वास वाटतो.”
‘बिन लग्नाची गोष्ट’ या चित्रपटात प्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ आणि गिरीश ओक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कथा समीर कुलकर्णी यांची असून, दिग्दर्शन आदित्य इंगळे यांचे आहे. या चित्रपटाची निर्मिती गॉडगिफ्ट एंटरटेन्टमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स यांनी केली आहे.