Raj Thackeray praises Dashavatar : मराठी मनोरंजनसृष्टीला सध्या सुगीचे दिवस आले आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गेल्या काही महिन्यांपासून मराठी सिनेमांची तिकीटबारीवर चांगलीच कमाई होताना दिसत आहे. मराठी सिनेमांना प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देत आहेत. ‘जारण’, ‘आता थांबायचं नाय’सारख्या सिनेमांनी चांगलीच कमाई केली.

अशातच सध्या सर्वत्र ‘दशावतार’ या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत कोटींची कमाई केली आहे. सिनेमागृहांत या चित्रपटाचे अनेक शो हाऊसफुल्ल होत आहेत. सर्वच क्षेत्रातून ‘दशावतार’ सिनेमाचं कौतुक होताना दिसत आहे.

अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ‘दशावतार’चं कौतुक केलं आहे. राज ठाकरेंनी केलेल्या ‘दशावतार’च्या कौतुकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत राज ठाकरे सिनेमा, त्यातील कलाकार, सिनेमातून मांडण्यात आलेला विषय तसंच तांत्रिक बाबींचं कौतुक करत आहेत.

‘दशावतार’बद्दल राज ठाकरे म्हणतात, “या सिनेमातून एका गंभीर प्रश्नाला हात घालण्यात आला आहे. अनेक वर्षे मी माझ्या भाषणांमधून ही गोष्ट सतत सांगत आलो आहे की, आपल्या जमिनी वाचवा, कारण जमीनच तुमचं अस्तित्व आहे. खरंतर हा संपूर्ण महाराष्ट्रातला प्रश्न आहे. फक्त एकट्या कोकणातच ही गोष्ट आहे, अशातला भाग नाही. संपूर्ण महाराष्ट्रात हे होत आहे. महाराष्ट्रातल्या अनेक जमिनींचा हा प्रश्न आहे.”

यानंतर ते म्हणतात, “सुबोध खानोलकरने अत्यंत चालाखीने हा विषय सिनेमाच्या माध्यमातून मांडला आहे. या गंभीर विषयाला त्याने दशावतारच्या अनेक रुपातून प्रेक्षकांसमोर आणलं आहे. अर्थात मी काय सिनेमाची कथा सांगत नाहीय. पण एक उत्कृष्ट छायाचित्रण, उत्तम संगीत आणि कमाल दिग्दर्शन असलेला हा सिनेमा आहे. याचा दिग्दर्शक सुबोध असला तरी महाराष्ट्राने यातून बोध घेणं गरजेचं आहे.”

पुढे कलाकारांचं कौतुक करत राज ठाकरे म्हणतात, “दिलीप प्रभावळकरांनी उत्तम काम केलं आहे, हे वाक्य खूप छोटं आहे. कारण ते खूप मोठे आहेत. त्यांनी संपूर्ण सिनेमात कमाल केलीय. महेश मांजरेकरनेसुद्धा साजेसं काम केलं आहे. प्रियदर्शिनीनेसुद्धा चांगलं काम केलं आहे. त्यांच्यासह बाकीच्या सर्वच कलाकारांनीसुद्धा छान कामं केली आहेत. एक मनोरंजक सिनेमा म्हणून हा सिनेमा न पाहता, ज्या विषयाला या सिनेमाने हात घातला आहे. त्या विषयासाठी हा सिनेमा सर्वांनी नक्कीच पाहिला पाहिजे.”