Rohan Kanawade on Sabar Bonda Movie: सध्या अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. ‘बिन लग्नाची गोष्ट’, ‘दशावतार’, ‘आरपार’ हे मराठी चित्रपट नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘साबर बोंडं’ या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे. ‘साबर बोंडं’च्या ट्रेलरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हा चित्रपट गाजला आहे. सनडान्स फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाला ग्रँड ज्युरी पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाची आणखी एक विशेष बाब म्हणजे त्यामध्ये एकही गाणं नाही. आता यावर चित्रपटाचे दिग्दर्शक रोहन कानवडे यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य केले आहे.
“मी लहानपणी जेव्हा…”
गाण्यांशिवाय प्रेमकहाण्या अपूर्ण असल्याचे अनेक चित्रपटांत दाखवले जाते. असे असले तरी ‘साबर बोंडं’ मध्ये मात्र गाणे का नाही? त्यावर रोहन कानवडे म्हणाले, “मी लहानपणी जेव्हा चित्रपटातील लव्हस्टोरी बघायचो, त्यावेळी असं वाटायचं की बापरे, मोठं झाल्यानंतर प्रेमात पडल्यानंतर नाचायला, गायला लागेल का तसंच पळून वगैरे जातात, असंच सगळ्या चित्रपटांत दाखवायचे. त्याबरोबरच मी असंही लहानपणी आजूबाजूला बघितलेलं होतं की, घरातले स्वीकारायचे नाहीत म्हणून काही मुलं-मुली पळून जायचे. त्यामुळे मला वाटायचं की, मोठं झाल्यानंतर हेच करावं लागेल. मला गायला येत नाही, नाचायला येत नाही. मग कसं होणार, अशी मला भीती वाटायची. नंतर समजलं असं काही नसतं.”
“जेव्हा खऱ्या आयुष्यात जेव्हा तुम्ही प्रेमात पडता, ते प्रेम चित्रपटांत दाखवतात तसं अजिबात नसतं. तर मला ते चित्रपटांत दाखवायचं होतं की, जेव्हा तुम्ही प्रेमात पडता, तेव्हा कसं वाटतं. तेव्हाचे ते क्षण काय असतात. त्यावेळी काही पार्श्वसंगीत वाजत नाही. तुम्हाला तुमच्या प्रियकराबरोबर किंवा प्रेयसीबरोबर थोडा शांत वेळ घालवायचा असतो. त्या गोष्टीनंच तुम्हाला खूप आनंद मिळतो. तर मला तसेच क्षण चित्रपटात दाखवायचे होते. म्हणजे बघणाऱ्यांनासुद्धा वाटेल की, आम्हीसुद्धा अशा क्षणांचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे गाणी वगैरे काहीच नको, असा विचार पहिल्यापासून होता.”
“मला असं वाटतं होतं की, जितका आपण त्यामध्ये खरेपणा आणू, तितका जास्त प्रभाव पडेल. म्हणून चित्रपटाची कथा लिहायच्या आधीपासूनच मी चित्रपटात बॅकग्राउंड म्युझिक, गाणी असं काही नसणार, असा निर्णय घेतला होता. पण, या चित्रपटात भावनिक नातं आणि छोटे छोटे क्षण दाखवले आहेत.”
दरम्यान, हा चित्रपट १९ सप्टेंबर २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सई ताम्हणकर, नागराज मंजुळे, निखिल अडवाणी हे कार्यकारी निर्मात्याच्या भूमिकेत आहेत.