Sai Tamhankar on working in the Hindi industry: अनेक मराठी कलाकार मराठीसह हिंदी चित्रपट, मालिका, वेब सीरीजमध्येदेखील काम करताना दिसतात.
प्रिया बापट, मिलिंद गवळी, शरद केळकर, उषा नाडकर्णी आणि असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी मराठीसह हिंदी इंडस्ट्रीमध्येदेखील त्यांची ओळख निर्माण केली आहे. यामध्ये आणखी एका अभिनेत्रीचे नाव प्रामुख्याने घेतले पाहिजे, ते म्हणजे सई ताम्हणकर.
सई ताम्हणकरने ‘मिमी’, ‘डब्बा कार्टेल’ अशा चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे, आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मराठी कलाकारांनी हिंदी इंडस्ट्रीमध्ये काम करण्याबाबत वक्तव्य केले आहे.
“यामुळे वाईट वाटण्याचे…”
सईने नुकतीच अमुक तमुक पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत तिला विचारण्यात आले की, असं होतं का की तुम्ही जेव्हा मराठीतून हिंदी इंडस्ट्रीमध्ये जाता, तेव्हा मराठी लोकं हा खूप मोठा झाला असं म्हणतात? किंवा तेव्हा अचानक तुमचं स्टारडम वाढतं असं तुम्हाला वाटतं का? जेव्हा मराठी माणूस हिंदीमध्ये काम करायला लागतो, तेव्हा त्याचे महत्त्व वाढते, असं का होतं? यावर सई म्हणाली, “आपण याकडे तांत्रिकदृष्ट्या पाहू. भारतात हिंदी इंडस्ट्री ही खूप मोठी आहे. आर्थिकदृष्ट्या, निर्मितीच्या दृष्टीने खूप मोठी आहे. त्याच्या तुलनेने आपली इंडस्ट्री आकाराने छोटी आहे; तर ही तुलना कायम राहणार, त्याला काही पर्याय नाही. त्याच्यामुळे हे कायम होत राहणार, हे सत्य आहे. यामुळे वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही.”
सई पुढे असे म्हणाली, “मला असं वाटतं की हे किती भारी आहे की कंटेंटच हिरो आहे. मराठी इंडस्ट्रीमध्ये कंटेंटला खूप महत्त्व आहे. आपल्याकडे ज्या प्रकारचे विषय हाताळले जातात, तितकी वैविध्यता मी कुठेच पाहिली नाही. आता हेहीदेखील सिद्ध झाले आहे की मराठी चित्रपटसुद्धा ५०-८०-९० कोटीत बनवू शकतात.”
अभिनेत्री असेही म्हणाली, “आपला समुदाय असा आहे की पटकन हुरळून जातो. आपण आपल्या लोकांचे फार कौतुक करत नाही. याबरोबरच मी हेही पाहिलं आहे की, खूप कलाकार जेव्हा हिंदीमध्ये काम करतात, समोरच्याच्या स्टारडमने ते खूप हुरळून जातात. ते विसरतात की त्यांनी स्वत:देखील काहीतरी कमावलं आहे. ते स्वत:चं अस्तित्व विसरून दुसऱ्याच्या स्टारडममध्ये इतके मिसळतात की त्यांना स्वत:चा आत्मसन्मान आहे की नाही इतपत गोष्टी होतात. हे कुठेतरी बदलायला पाहिजे. स्वत:च्या आत्मसन्माचा तुम्हीच जर आदर केला नाही, तर लोक तुमचा आदर कसा करतील.”
सई ताम्हणकर असेही म्हणाली की, मलाही वाटतं की मराठीमध्ये ५०-६० कोटींचा चित्रपट बनायला हवा. पण, ही हळूहळू होणारी प्रोसेस आहे; एका रात्रीत या गोष्टी होणार नाही.