अभिनेता संतोष जुवेकर(Santosh Juvekar) हा काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. संतोष जुवेकरने छावा चित्रपटात रायाजी ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिका व लूकने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याबरोबरच विविध मुलाखतींत अभिनेत्याने छावा चित्रपटाच्या शूटिंगचे सांगितलेले किस्सेसुद्धा चर्चेत असल्याचे दिसत आहे. छावा चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विकी कौशलबरोबर केलेल्या कामाचा अनुभव, चित्रपटातील काही प्रसंगांचे शूटिंग करतानाच्या भावना अशा अनेकविध बाबींवर संतोषने वक्तव्य केले आहे. आता एक मुलाखतीत अभिनेत्याने काही चित्रपट हे पैशांसाठी करावे लागतात, असे म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाला अभिनेता?

अभिनेता संतोष जुवेकरने ‘लोकशाही फ्रेंडली’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्याने म्हटले, “स्पष्टपणे सांगायचं झालं, तर मी जरी कलाकार असलो तरी मला माझं घरही चालवायचं आहे. त्यामुळे मला काही सिनेमे करावे लागतात, जिथे मला फक्त पैशाकडे बघायचं आहे. अडीच वर्षांचा लॉकडाऊनचा काळ बघितला, तर तो थोडासा भरून काढायचा आहे. कारण- माझी भरपूर प्रॉपर्टी आहे, माझे इतर चार बिझनेस आहेत, असं नाहीये. मला पटलं, तरच काम करेन, नाही आवडलं तर नाही करणार. मला वाटतं की, असं कुठल्या कलाकाराने करूही नये. भविष्यात माझ्याकडे भरपूर पैसे आले ना की, मग मी थांबेन. तेव्हा मी ठरवेन की मला अमुक एखादं काम करायचं आहे, अमुक एखादं काम करायचं नाही. तेव्हा मी सिलेक्टिव्ह होईन. पण, भरल्या पोटानंच सिलेक्टिव्ह होता येतं, रिकाम्या पोटानं काही करता येत नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या ज्या महत्त्वाच्या गरजा आहेत. त्या भागवण्याकरिता ते सिनेमे करावे लागतात”, असे म्हणत अभिनेत्याने चित्रपटांच्या निवडीविषयी त्याचे मत व्यक्त केले आहे.

संतोष जुवेकरने ‘छावा’मध्ये रायाजी भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील काही सीन हे डोळ्यांत पाणी आणणारे, तर काही अंगावर काटे आणणारे आहेत, असेही अभिनेत्याने म्हटले आहे.

दरम्यान, अभिनेता संतोष जुवेकर झेंडा, रेगे, मोरया, रानटी, एक तारा, अस्सं सासर सुरेख बाई, वादळवाट, या गोजिरवाण्या घरात अशा चित्रपट व मालिकांसाठी ओळखला जातो. आता ‘छावा’मधील त्याची रायाजी ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Santosh juvekar on movies selection says some films have to do for money nsp