Netizen on Santosh Juvekar Post: पडद्यावरचे कलाकार त्यांच्या अभिनयामुळे घराघरांत पोहोचतात. त्यांच्या नवीन कलाकृतींमुळे ते अनेकदा चर्चेत असतात. अनेकदा त्यांनी केलेली वक्तव्ये, इतर कलाकारांबाबत मांडलेले मत यामुळेदेखील त्यांची मोठी चर्चा होताना दिसते.
सोशल मीडियावरील पोस्ट, मुलाखतींमध्ये केलेली वक्तव्ये, यामुळे जितके कलाकारांचे कौतुक होते, तितकेच त्यांना अनेकदा ट्रोलिंगचा सामनादेखील करावा लागतो. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत अभिनेता संतोष जुवेकरने ‘छावा’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, अक्षय खन्नाला औरंगजेबाच्या वेशभूषेत पाहिल्यानंतर त्याच्याशी मी बोललो नाही, असे वक्तव्य केले होते.
त्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले. त्याच्या या वक्तव्यावर अनेक मीम्सदेखील व्हायरल झाले. त्याच्या सोशल मीडियावरील फोटो किंवा पोस्टवर अनेक कमेंट्स पाहायला मिळतात.
आता अभिनेता संतोष जुवेकरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये महेश मांजरेकर, अशोक सराफ, शिवाजी साटम, सतीश आळेकर, विक्रम गोखले हे कलाकार दिसत आहेत. या दिग्गज कलाकारांबरोबर संतोष जुवेकरदेखील या फोटोमध्ये दिसत आहे. तो या फोटोत सर्वांत पुढे आहे. हा फोटो ‘मी शिवाजी पार्क’ या चित्रपटादरम्यानचा आहे. हा फोटो शेअर करताना संतोष जुवेकरने दिलेली कॅप्शन लक्ष वेधून घेत आहे.
संतोषने लिहिले, “या फोटोमध्ये भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, अशी भावना आहे. मग कायमच “रहे मैदान में आगे”, साक्षात अभिनयाचे पाच स्वामी पाठीशी उभे आहेत असं वाटतं.” पुढे अभिनेत्याने असेही लिहिले की, आठवणीतल्या साठवणीतला फोटो आहे.
नेटकरी काय म्हणाले?
अभिनेत्याच्या या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. काहींनी त्याला ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला आहे. काहींनी त्याच्या अभिनयाचे कौतुक केले आहे, तर काहींनी त्याच्या मुलाखतीतील वक्तव्यांवरून खिल्ली उडवली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “संतोष दादाला कितीही ट्रोल करा, पण त्याने केलेला उत्तम अभिनय आणि त्याच्या जोरावर मिळालेले यश हे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय.”
दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “तुझं काम बोलतंय, चालू दे भाई, तू बेस्ट होतास आणि आहेस. ‘झेंडा’, ‘मोरया’ हे चित्रपट म्हणजे तुझ्या अभिनयाचे कळस आहेत. लोकांचं काय, आईबापालाही नीट बोलत नाहीत, ते तुला काय ओळखणार. तू तुझ्या कामातून उत्तर दे, आम्ही कायम तुझ्याबरोबर आहोत.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “खूप छान सर, कमेंटमध्ये बोलणाऱ्यांवर लक्ष देऊ नका, कारण त्यांची लायकीसुद्धा नाही तुमच्यासमोर उभी राहायची.”
“देवाने कलाक्षेत्रासाठी वेचून निवडलेली माणसं”, “तुमच्या पाठीशी एकदम दिग्गज अन् उत्तम असे कलाकार उभे आहेत”, अशा अनेक कौतुक करणाऱ्या कमेंट्स दिसत आहेत; तर काही नेटकऱ्यांनी लिहिले, “मी तिकडे बघूच शकत नाही”, “काही लोक ट्रोल करतात, पण एक गोष्ट लक्षात ठेवा तो फेमस झाला”, “मी मागे बघितलंपण नाही, बघूच शकत नाही”, अशाही कमेंट्स पाहायला मिळत आहेत. मी मागे बघूच शकत नाही, अशा एका कमेंटला अभिनेत्याने, “चालू दे, चांग भलं” अशी कमेंट करत उत्तर दिले आहे.
दरम्यान, अभिनेता नुकताच ‘छावा’ या चित्रपटातून प्रेक्षकांटच्या भेटीला आला होता.