Alka Kubal reveals How She Lose Weight: अलका कुबल यांनी आजवर मुलगी, बहीण, पत्नी अशा अनेक भूमिकांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. नुकत्याच त्या ‘वजनदार’ या नाटकातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. अलका कुबल २७ वर्षांनंतर रंगभूमीवर परतल्याने चाहत्यांसह अनेक कलाकारांनी आनंद व्यक्त केला आहे. या नाटकात त्यांच्याबरोबर अभिनेता अभिषेक देशमुखदेखील प्रमुख भूमिकेत आहे. याआधी अभिषेक देशमुख ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत काम करताना दिसत होता.

आता अलका कुबल यांनी नुकत्याच एका मुलाखतीत वजन कमी कसे केले, यावर वक्तव्य केले. अलका कुबल यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. या मुलाखतीत त्यांना विचारण्यात आले की, जेव्हा त्या चित्रपटात काम करायच्या तेव्हा त्या काय डाएट करायच्या? यावर अभिनेत्री म्हणाल्या, ” तेव्हा मी तशीच होते. मी अपघातानंतर बदलले. पण, आताच मी योगायोगाने ९-१० किलो वजन कमी केलं आणि मला हे नाटक मिळालं.”

वजन कसं कमी केलं?

वजन कसं कमी केलं? यावर बोलताना अलका कुबल म्हणाल्या, मी भरपूर चालते. डाएटमध्ये भाकरी खाते. भात जवळजवळ खात नाही. जर मासे खाणार असेल तर भात खाते, असं ठरलेलं डाएट असतं. फळं खाते, त्यामुळे मी वजन कमी केलं.

मी वजन ठरवून कमी केलं, कारण कामंही भरपूर येत आहेत. पाच-सहा सिनेमे करतेय. एक हिंदी वेब सीरिज बहुधा करेन. तर कामं भरपूर आल्यानं मला वाटायला लागलं की आपण फिट असलं पाहिजे.

सौंदर्याबाबत बोलताना अलका कुबल म्हणाल्या, “आपलं मन आनंदी असेल, आपण जर मनाने समाधानी असू, तर ते चेहऱ्यावर येतं. वय कधीही लपत नाही. तरुण दिसण्याचा प्रश्न नाही, फिट असण्याचा प्रश्न आहे. आता बारीक झाले म्हणून मी १६ वर्षांची दिसणार नाही. आहे ते वय हे दिसणार आहे. पण, त्या वयातही फिट राहणं मला फार महत्त्वाचं वाटतं.”

अलका कुबल यांचे ‘माहेरची साडी’, ‘लेक चालली सासरला’, ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी’ असे अनेक चित्रपट गाजले आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. याच मुलाखतीत त्यांनी त्यांच्या मुलींच्या करिअरबाबत वक्तव्य केले होते. त्यांनी त्यांच्या आवडीने व्यावसायिक क्षेत्र निवडल्याचे त्यांनी म्हटले. तसेच अभिनयात येण्यासाठी विरोध नव्हता, पण फारसा पाठिंबादेखील नव्हता, असेही अलका कुबल म्हणाल्या.

काही दिवसांपूर्वी सुकन्या मोनेंनी त्यांच्या ‘वजनदार’ या नाटकाचे कौतुक केले होते. चाहतेदेखील या नाटकाचे कौतुक करताना दिसत आहेत. आता येत्या काळात त्यांच्या ‘वजनदार’ नाटकाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.