Sonali Kulkarni On Susheela Sujeet Movie : गेल्या दोन महिन्यांत मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसर चांगलीच कमाई केली आहे. गेल्या काही दिवसांत अनेक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यापैकी काही चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली आहे. प्रेक्षक पसंतीबरोबरच बॉक्स ऑफिसवरदेखील या चित्रपटांनी चांगलीच कमाई केली. यात ‘एप्रिल मे 99’, ‘गुलकंद’, ‘आता थांबायचं नाय’ आणि नुकताच प्रदर्शित झालेला ‘जारण’ हा चित्रपटही आहे. वेगळी विषय आणि वेगळी धाटणी असलेल्या या चित्रपटांनी प्रेक्षकांना चित्रपटगृहात आणण्याचे काम केलं.

याउलट काही चित्रपटांची चर्चा बरीच झाली किंवा त्या चित्रपटातील काही महत्त्वपूर्ण घटकांमुळे ते लक्षवेधीही ठरले. पण बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांना म्हणावा तसा गल्ला जमवता आला नाही. असाच बॉक्स ऑफिसवर फार यश मिळवता न आलेला चित्रपट म्हणजे ‘सुशीला सुजीत’. प्रसाद ओक दिग्दर्शित ‘सुशीला सुजीत’ हा चित्रपट १८ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र या चित्रपटाला तिकीटबारीवर म्हणावं तसं यश मिळवता आलं नाही.

‘सुशीला सुजीत’ या चित्रपटात स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हे दोघे मुख्य भूमिकेत होते. पण हा चित्रपट का चालला नाही? याबद्दल सोनालीने तिचे मत व्यक्त केलं आहे. अमोल परचुरेंच्या कॅचअपमध्ये सोनाली याबद्दल म्हणाली, “‘सुशीला सुजीत’ चित्रपट निवडताना प्रसाद ओकवर विश्वास होता. मला तो दिग्दर्शक म्हणून आवडतो. त्याच्याबरोबर मला दहा वर्षांपुर्वी ‘कच्चा लिंबू’ चित्रपट करताना मजा आली होती. तसंच यावेळी त्याने माझ्याकडे आणलेला विषय हा वेगळ्या धाटणीचा होता आणि या भूमिकेसाठी त्याने माझा विचार करणं यामुळे मला खुप मजा आली होती.”

सोनाली कुलकर्णी इन्स्टाग्राम पोस्ट

यानंतर ती म्हणते, “प्रसादबरोबर काम करताना खूप दमछाक होते. कारण प्रसाद स्वत: खूप चांगला अभिनेता आहे आणि तो एखादा सीन समजावून सांगताना अभिनय करून दाखवतो. हे सगळं जमवून आणणं खूप अवघड असतं. ‘सुशीला सुजीत’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची स्वप्नीलने विशेष तयारीसुद्धा केली होती. त्याने व्यवस्थित प्लॅन केला होता. असं करून आपण एखादा सिनेमा करतो. आता तो का चालला नाही याबद्दल बोलण्याचा मला हक्क नाही, कारण मेहनत घेऊनही सिनेमा पुढच्या आठवड्यात जात नाही, यासाठी मला फार वाईट वाटतं आणि याबद्दल मला फेसबुक लाईव्ह करावसं वाटतं की, असं नाकारू नका; कृपया सिनेमा बघा.”

यापुढे सोनाली म्हणाली, ” पण आताचा हा काळ गोंधळात टाकणारा काळ आहे असं मला वाटतं. म्हणजे मराठी नाटकं चालत आहेत, मग सगळीच नाटकं चांगली आहेत का? की आपण त्यांना पाठिंबा म्हणून ती नाटकं बघत आहोत. म्हणजे आता प्रेक्षक नाटकं बघायला जात आहेत आणि सिनेमे बघत नाहीत, याची कारणं शोधणं गरजेचं आहे. सिनेमाकडे प्रेक्षक का येत नाहीत, हे शोधण्याची वेळ आली आहे. मला चित्रपट चालला नाही याचं खूप दु:ख झालं.”

यानंतर सोनालीने सांगितलं, “मी प्रमोशनमध्ये इतकं भरभरून बोलले होते, प्रवास केला, इतक्या जणांना आवाहन केलं होतं, ते खोटं तर नव्हतं. मला असं वाटतं की, मी चांगलं काम केलं आहे. सिनेमा मजेदार आहे. त्यातले एक-दोन मुद्दे आवडणं किंवा न आवडणं आपण मान्य करू शकतो. मला असं वाटतं की, आपण क्लायमेक्ससाठी दिग्दर्शकाला वेठीशी धरू शकत नाही, कारण त्याचे अनेक क्लायमेक्स असू शकतात. त्यावर चर्चा होऊ शकते, पण त्याआधीची अडीच तासांची गोष्ट आपण कशी नाकारू शकतो? सहानुभूतीने बघावं इतकेही आपण भिकेला लागलेलो नाही, पण नाटक वर्सेस सिनेमा असं युद्ध कधी सुरू झालं, याचा विचार करायला पाहिजे.”