Uddhav Thackeray Watched Dashavatar Movie : मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार’ सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. या सिनेमाने अवघ्या ७ दिवसांत बॉक्स ऑफिसवर ९.४५ कोटींची कमाई केली आहे. याशिवाय अनेक भागात ‘दशावतार’चे शोज देखील वाढवण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांत मनोरंजनसृष्टीसह राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हा सिनेमा पाहिला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच हा सिनेमा प्रत्येक मराठी प्रेक्षकाने पाहावा असं आवाहन सर्वांना केलं होतं.

आता यानंतर उद्धव ठाकरेंनी ‘दशावतार’ सिनेमाचं कौतुक केलं आहे. “सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांच्या मनाची पकड घेणारा परिपूर्ण सिनेमा मी बऱ्याच वर्षांनी पाहिला” असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी नुकताच आपल्या कुटुंबासह हा सिनेमा पाहिला. यावेळी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांच्यासह ‘दशावतार’ची संपूर्ण टीम, यामधील कलाकार, दिग्दर्शक असे सगळेजण उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, “दशावतार’ हा सिनेमा प्रत्येकाने पाहिला पाहिजे कारण, ही कथा कोकणातील असली तरी, व्यथा संपूर्ण महाराष्ट्राची आहे. अनेकदा चित्रपट प्रदर्शित होतात, केवळ व्यथा मांडली जाते पण, त्यावर इलाज सांगितला जात नाही. ‘दशावतार’मध्ये कथा आहे, व्यथा मांडली आहे आणि त्यावरचा इलाजही सांगितला आहे. हेच या सिनेमाचं वेगळेपण आहे. केवळ कोकणातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांनी हा सिनेमा जरूर पाहावा.”

दिलीप प्रभावळकरांचं विशेष कौतुक

“दिलीपजींचा अभिनय, त्यांचं काम मी गेली अनेक वर्षे पाहतोय. त्यांच्या अभिनयाला तोडच नाहीये. या वयातही तुम्ही इतकं छान काम कसं करता असं अनेकांनी त्यांना विचारलंय पण, मी उलट म्हणेन की या वयात ते इतकं अप्रतिम काम करत असतील तर पुढे आणखी काय करतील. खरोखरच या सिनेमात त्यांनी केलेलं काम अविश्वसनीय आहे. संपूर्ण टीमची मेहनत दिसून येतेय” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

आज आपण कुठे आहोत नि कुठल्या दिशेने चाललो आहोत, हे वेळीच ओळखलं नाही तर आपण एका कडेलोटाच्या टोकावर आहोत, हे दाखवून देणारा हा चित्रपट आहे. सगळ्यांचीच कामं उत्तम आहेत. पण दिलीप प्रभावळकर यांनी जे करून ठेवलंय ते अद्भुत आहे. सुबोध खानोलकर या तरूण दिग्दर्शकाने एक परिपूर्ण चित्रपट मराठीला दिलाय. असं मत व्यक्त करत उद्धव ठाकरेंनी ‘दशावतार’च्या टीमचं कौतुक केलं आहे.