Nana Patekar on retirement: अभिनेते नाना पाटेकर यांनी आजपर्यंत विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आजही ते हिंदी-मराठी चित्रपटांत वेगळ्या धाटणीच्या भूमिकांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात.

अभिनाबरोबरच नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे ‘नाम फाऊंडेशन’ या संस्थेमार्फत काम करताना दिसतात. ‘नाम फाउंडेशन’ला नुकतीच १० वर्षे पूर्ण झाली. या दशकपूर्तीच्या सोहाळ्याला नितीन गडकरी, शास्त्रज्ञ विजय भटकर, तसेच चंद्रकांतदादा पाटील हजर होते. आता नाना पाटेकर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नवीन सुरुवात करणार असल्याचे वक्तव्य केले आहे.

“मी वयाच्या १३ व्या वर्षापासून नोकरी…”

नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी ‘प्लॅनेट मराठी’शी संवाद साधला. त्या मुलाखतीत त्यांना विचारले गेले की, तुम्ही नुकतीच घोषणा केली की, चित्रपटसृष्टीतून मी लवकरच निवृत्त होणार आहे. त्यावर नाना पाटेकर म्हणाले, “कधीतरी एखादी भूमिका आली. मला आवडली, छान वाटली, चित्रपट करावासा वाटला, तर मी करेन. पण, आता प्रामुख्याने ते करतोय, ते बंद करेन. ७५ वर्षे म्हणजे खूप होतात.”

“मी वयाच्या १३ व्या वर्षापासून नोकरी करतोय. १३ वर्षापासून ते आता ७५ वर्षांपर्यंत मी काम करतोय. आता काहीतरी वेगळं जे आवडतंय, मनापासून जे करावंसं वाटतं, ते करेन. ‘नाम’च्या माध्यमातून जे करतोय, ते करेन. कुठेतरी आपण थांबायचं असतं.”

“विक्रम गेल्यानंतर मला थोडा त्रास…”

“माझा अतिशय आदर्श असलेला नट आणि त्याच्यासमोर मी हात जोडतो तो विक्रम गोखले. एरवी मी फारसा हलत नाही. पण, विक्रम गेल्यानंतर मला थोडा त्रास झाला. तो त्रास आजही होत राहतो. मला असं वाटतं की, काहीतरी त्याच्याही मनातल्या गोष्टी आहेत, त्या राहिल्या आहेत. तर त्या गोष्टी मी या माध्यमातून पूर्ण करू शकेन. तो माझा थोरला भाऊ होता. काही मंडळी आयुष्यभर तुम्हाला आशीर्वादच देत राहतात. त्यातला विक्रम होता. बरं मी ज्यावेळी काम बंद करेन, त्यावेळी दुसरा कोणीतरी माझी जागा घ्यायला येईल. नवीन लोक येत राहतात. मी रिटायर होत नाही, तर मी पुन्हा नवीन सुरुवात करतोय. या एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात जातोय. पण, नवीन काहीतरी सुरुवात करतोय. सतत गावागावांत जायचं. लोकांना भेटायचं. देवळात राहायचं, तिथेच काहीतरी खायचं. तिथूनच पुढे जायचं.”

“देवाकडे आम्ही…”

“आता कसं मी कुठेही गेलो तरी मला छान छान हॉटेलमध्ये राहता येतं. छान बडदास्त असते. हे सगळं विसरायचं आणि सर्वसामान्य माणसाप्रमाणे जगायचं. हे नाव वगैरे सगळं त्यांच्यामुळे आहे. जे ऐश्वर्य आहे ते माझ्यासाठी खूप आहे. देवाकडे आम्ही थोडं मागितलं होतं. देवानं दोन्ही हातांत मावणार नाही इतकं दिलं. त्यामुळे फार खूश आहोत.”

पुढे मकरंद अनासपुरे यांच्याबद्दल नाना पाटेकर म्हणाले, “मला असे मित्र मिळाले. हा माझ्यापेक्षा वयाने लहान आहे; पण इतकं छान काम करतो, इतका मोठा माणूस आहे. ही माणसं सांभाळायचीत. तर मी रिटायर होत नाही, मी नवीन सुरुवात करतोय.”

दरम्यान, नाना पाटेकर ‘हाऊसफुल ५’ या चित्रपटात दिसले होते.