|| गायत्री हसबनीस

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पांघरूण’ या मराठी चित्रपटाची चर्चा ‘मामि फिल्म फेस्टिव्हल’पासूनच सुरू झाली होती. महेश मांजरेकर दिग्दर्शित चित्रपट असल्यानेही या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. टाळेबंदीच्या विरामानंतर ‘नाय वरन भात लोन्चा कोन नाय कोन्चा’ हा मांजरेकरांचा चित्रपट प्रदर्शित झाला. आता लगोलग त्यांचा ‘पांघरूण’ हा दुसरा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित झाला आहे. प्रेमकथा, स्वातंत्र्योत्तर काळातील कुटुंब, माणसे, नातेसंबंध आणि स्त्री-पुरुष व्यक्तिरेखांचे भावविश्व यांची गुंफण असलेल्या या चित्रपटाची कथा लिहिण्यापासून ते पडद्यावर साकारण्यापर्यंतचे आपले अनुभव दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना उलगडले.

‘पांघरूण’ ही एक स्वतंत्र कथा आहे, त्यामुळे चित्रपटातील संहिता ही त्या कथेच्या फार जवळ नाही. दिग्दर्शक म्हणून ‘पांघरूण’ या लहानशा कथेला समोर ठेवून मी कथाविस्तार केला आहे. कथेच्या आधारे आपल्याला एक कल्पना तयार करता येते किंबहुना त्याचे चित्रण डोळय़ासमोर उभे राहते. त्याच धर्तीवर मी संपूर्ण चित्रपटाची संहिता लिहून काढली’’, अशी माहिती महेश मांजरेकरांनी दिली. हा चित्रपट मोठय़ा पडद्यावरच प्रदर्शित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि  तो सार्थ ठरला आहे याची प्रचीती चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादावरून येते आहे.

या  चित्रपटामागची प्रक्रिया मांजरेकरांनी सविस्तर उलडून सांगितली. ‘‘संहिता संपूर्ण तयार झाल्यानंतर मला प्रामाणिकपणे वाटलं की ही कथा गौरीसाठी योग्य आहे. तिच्यासाठी हा चित्रपट करायचे ठरले. त्यानंतर ‘पांघरूण’साठी मी निर्माते शोधू लागलो. तेव्हा हळूहळू मोठे नामवंत मराठीतले संगीतकार चित्रपटाशी संलग्न झाले. संगीत दिग्दर्शक सलील कुलकर्णी, अजित परब आणि इतर संगीतकारांनी या चित्रपटाला संगीत दिले. त्याचबरोबर चित्रपटाचे पाश्र्वसंगीतही तयार झाले. अभिनेता, गायक अमोल बावडेकरही या चित्रपटाशी जोडला गेला. मी कोकणातही गेलो, तिथे चित्रीकरणासाठी आम्ही फिरलो आणि अशा प्रकारे सर्व प्रक्रियेला सुरुवात झाली’’, असे मांजरेकरांनी सांगितले.

या चित्रपटातील पात्रांचे रेखाटन हे कथेतून साधारण साठ वर्षे जुन्या काळातील मानवी जीवनाशी जुळवून ठेवण्याचे कसब पुन्हा एकदा महेश मांजरेकरांनी रंगभूषा आणि वेशभूषेच्या माध्यमातून साध्य केले आहे. या सर्व पात्रांची रूपरचना, त्यांचे स्वभाव कसे साकारले याबद्दल बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, ‘‘मला त्याबाबतीत फार काही कठीण गेलं नाही, कारण मला ‘काकस्पर्श’चा अनुभव होताच. कोकणातील घरे पाहिली तर त्या काळातील स्थापत्यशास्त्राप्रमाणे आजही सुस्थितीत अशी घरे पाहायला मिळतात. वेशभूषेचे म्हणाल तर स्वातंत्र्यपूर्व काळातील ही कथा असल्याने त्या काळातील किशोरवयीन मुलींच्या वस्त्रांचे संदर्भही सहज उपलब्ध आहेत. त्यातून विख्यात वेशभूषाकार आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचे सहकार्य होतेच, त्यामुळे खूप हुशार कलाकार-तंत्रज्ञ या चित्रपटाशी जोडले गेल्याने खरं सांगायचे झाले तर फार कठीण गेले नाही’’, अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली. 

 मांजरेकरांचे दोन चित्रपट सध्या प्रदर्शित झाले असून इतर मराठी चित्रपटही वेगाने प्रदर्शित होत आहेत. टाळेबंदीच्या बऱ्याच कालावधीनंतर आता मराठी प्रेक्षकांना विविध आशयांचा आस्वाद तिकीट काढून चित्रपटगृहातून मिळतो आहे. त्यामुळे मराठी प्रेक्षकांना ही गोड भेट मिळाली असली तरी मध्यमवर्गीय प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून चित्रपटासाठी अद्यापही गोष्टी रूळावर यायला थोडी वाट पाहावी लागेल असे त्यांनी सांगितले.  ‘‘प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभत असला तरी या टाळेबंदीच्या परिणामामुळे मध्यमवर्गीय प्रेक्षक खूपच भरडला गेला आहे. त्या वर्गाला या सगळय़ाचा अधिक आर्थिक त्रास झाला आहे जो आपला मुख्य प्रेक्षक आहे. त्यामुळे हळूहळू ते यायला लागतील, पण ते येतायेत याचा मला फार आनंद आहे. दुसरी गोष्ट म्हणजे दिल्लीतील बरेच चित्रपटगृह हे बंद आहेत त्यामुळे मराठी चित्रपट येथे प्रदर्शित करण्याला वाव मिळतो आहे. माझ्यासारखे खूप निर्मात्यांचे, दिग्दर्शकांचे आर्थिक नुकसान झाले आहे तेव्हा चित्रपट प्रदर्शन संख्याही वाढली आहे हे नक्की’’, असे मांजरेकर म्हणाले.

एकंदरीत नवनव्या विषयांचा शोध घेणारे दिग्दर्शिक महेश मांजरेकर नव्या वर्षांतही एक बिगबजेट मराठी ऐतिहासिक चित्रपट करायच्या तयारीत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या सर्व चित्रपटांमध्ये ‘पांघरूण’ हा चित्रपट आपल्याला सर्वोत्कृष्ट वाटतो, असेही त्यांनी सांगितले.

‘महाराष्ट्रात सर्व भागात हिंदूीचा प्रभाव आहे त्यामुळे अगदी मराठी चित्रपटांच्या बाबतीत म्हणाल तर हिंदूी चित्रपटांची स्पर्धा ही कायम असेल जे आपण काही केल्या बदलू शकत नाही. आता दाक्षिणात्त्य चित्रपटांचा वेग हा इतका वाढलाय की ही इंडस्ट्री भारतावर पुढील दोन वर्षांत राज्य करणार आहे. ‘बाहुबली’च्या वेळेसच ते ओळखायला हवे होते. सध्या ‘के.जी.एफ’ची आतुरता तर अख्ख्या देशभरात हिंदूी चित्रपटांपेक्षाही अधिक आहे. एकूणच प्रेक्षकांना हे कळलंय की आपण स्टार नाही चित्रपट पाहयला जातो आहोत त्यामुळे मग आपले मराठी चित्रपटही हिंदूीत भाषांतरित करून प्रेक्षकांना दाखवायला काय हरकत आहे? भारतीय प्रेक्षकांनाही कळू देत की तुम्ही ज्या चित्रपटांचा शोध घेताय ते मराठीतही आहेत. अशाप्रकारे मराठीचा विस्तार वाढला तर आपणही मराठी चित्रपटांचे बजेट वाढवू शकतो की!, असंही ते विश्वासाने सांगतात.

‘काकस्पर्श’सारखा ‘पांघरूण’ नाही’

‘‘कोकणातील चित्रीकरण, स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थिती, वेशभूषा, प्रेमकथा, किशोरवयीन विधवा स्त्री व्यक्तिरेखा या सगळय़ांचा सारखेपणा पाहिला तर कथेशी मात्र ‘काकस्पर्श’ या चित्रपटाचा काहीही संबंध नाही’’, असे महेश मांजरेकरांनी स्पष्ट केले. ‘‘हा ‘काकस्पर्श’चा पुढील भाग नसून ‘पांघरूण’ ही स्वतंत्र वेगळी कथा आहे. प्रेमकथा असल्याने पुन्हा एक विलक्षण प्रेमकहाणी अशी ओळ या चित्रपटाला आहे’’, असेही मांजरेकरांनी सांगितले. या पद्धतीच्या प्रेमकथा खूप मोठय़ाही वाटतात त्यामुळे ‘पांघरूण’ कथेचा पुढचा भाग लिहून एक चित्रपट-त्रयी करायलाही खूप आवडेल, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

कथा असलेले चित्रपट मला नि:संशय करायला आवडतात. मूळ कथा, संहिता यावर चांगले चित्रपट होतात. तांत्रिकतेच्या नावाखाली चित्रपट करायला गेलात तर तुम्ही उलट अधिक वाईटप्रकारे जगासमोर तोंडघाशी पडता. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ओटीटीमुळे तंत्रज्ञान काय?, हे अख्ख्या जगाला आता कळले आहे. तेव्हा आता प्रेक्षकांना तुम्ही तंत्राने चकित करू शकत नाही मग कथा चित्रपटातून जितकी तुम्ही फुलवाल तितकेच त्याचे निकाल  उत्तमोत्तम राहतील.

– महेश मांजरेकर, दिग्दर्शक नवं काही : गेहराईयाँ.

करण जोहर यांच्या ‘धर्मा प्रॉडक्शन’च्या बॅनरखाली शकुन बात्रा दिग्दर्शित ‘गेहराईयाँ’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होतो आहे. आधुनिक काळातील प्रेमसंबंधांवर उघडपणे बोलणारा हा विषय असून चित्रपटाचा संपूर्ण लूक पाश्चिमात्य संकल्पनेकडे झुकणारा आहे, दोन भारतीय युवक-युवतींच्या प्रेमकथेतील प्रत्येक अधुरा टप्पा आणि त्या प्रवासात एकमेकांना ओळखण्याचा प्रयत्नही किती निष्फळ ठरतो यावर भाष्य करणारी ही कथा असून दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. टीया (अनन्या पांडे) आणि झैन (सिद्धांत चतुर्वेदी) एकमेकांच्या प्रेमात आहेत, विवाहबंधनात अडकण्याची तयारी सुरू असतानाच टीयाची बहीण आलिशा झैनच्या आयुष्यात येते. झैन आणि आलिशाने हे विचित्र प्रेमबंधन स्वीकारलं असलं तरी टीया आपल्या प्रियकाराचे नवे नाते स्वीकारू शकेल का?  प्रेमत्रिकुटात अडकलेल्या या तिघांचा पुढचा प्रवास नक्की कसा असेल? यावर भाष्य करणारी ही वास्तवदर्शी कथा लवकरच चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

कलाकार – दीपिका पदुकोण, अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी, धैर्या कारवा, रजत कपूर आणि नसिरुद्दीन शहा  कधी – ११ फेब्रुवारी कुठे – अ‍ॅमेझॉन प्राइम

रिचर

‘जॅक रिचर’ नामक चित्रपट मालिका अभिनेते टॉम क्रुझ यांनी गाजवल्यानंतर सहा वर्षांनंतर हेच पात्र ‘रिचर’ या हॉलीवूड वेबमालिकेच्या रूपाने प्रेक्षकांसमोर आले आहे. ‘रिचर’ या कथेत अमेरिकन लष्करी अधिकारी असलेल्या जॅक रिचरच्या करामती आहेत. ली चाइल्ड्स यांच्या याच व्यक्तिरेखेवरील गुन्हेगारीवर आधारित कादंबऱ्या, कथा प्रसिद्ध आहेत. त्यापैकीच चाइल्ड्स यांनी ‘किलिंग फ्लोअर’ या १९९७ साली लिहिलेल्या कांदबरीवरून ‘रिचर’ ही वेबमालिका बेतण्यात आली आहे. जॅक रिचर हा लष्करी अधिकारी आहे, त्याचा तपास हा एका खुनाभोवती आहे. दुर्दैवाने की सुदैवाने तो एका खून प्रकरणात अडकला आहे. त्याच्यावर गंभीर आरोपही करण्यात आले असून दुसरीकडे हेच खून प्रकरण उलगडण्यात त्याची मदत पोलिसांना हवी आहे. हे प्रकरण नेमके काय आहे? आणि रिचर यात कसा अडकला? त्यातून पोलिसांना कसा सामोरा जाणार, या सगळय़ा प्रश्नांची उत्तरं देणारी ही  रंजक मालिका आहे. हे पात्र प्रख्यात अभिनेते टॉम क्रुझ यांनी अजरामर करून ठेवल्याने या मालिकेतूनही तेच समोर येतील अशी अपेक्षा प्रेक्षकांना होती, परंतु अभिनेते अलन रिट्चसन यांची निवड या भूमिकेसाठी झाली असून दिग्दर्शन निक सॅन्टोरा यांनी केले आहे.

कलाकार -अलन रिट्चसन, मारिया स्टेन, विला फिट्झगेर्लाड आणि मॅलकन गुडविन कधी – ४ फेब्रुवारीपासून प्रदर्शित  कुठे – अ‍ॅमेझॉन प्राइम

रक्तांचल २

तद्दन गुन्हेगारीपट ज्यात कुठल्याच प्रकारे बुद्धीचा वापर करायची गरज नसते असा विषय हिंदूीतील वेबमालिकांमधून सर्रास पाहायला मिळतो ‘रक्तांचल’च्या दुसऱ्या पर्वातही राजकारण, खूनखराबा, प्रणय, गुन्हेगारी, शिव्या, खोटारडेपणा, हिंसा, रक्तपात असा सगळा मसाला ठासून भरलेली वेबमालिका ‘रक्तांचल’ प्रेक्षकांनी पाहिली आहे. याचा पुढचा भागही त्याच धाटणीचा आहे. रितम श्रीवास्तव यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले असून सर्वेश उपाध्याय यांनी लेखन केले आहे. वासीम खान या पात्राचा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदावर डोळा आहे. त्यामुळे विरोधक, पत्रकार आणि नेते सगळेच वासीम खानविरोधात एकवटले आहेत.  या सगळय़ा युद्धात मुख्यमंत्रिपद वासीम खान विरोधकांकडून हिसकावून घेणार का? आणि मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठीचे डावपेच, योजना, गुन्हा, हिंसा आणि राजकारण काय असेल? व सरतेशेवटी मुख्यमंत्रिपदासाठी कोणी विजयी होणार,  या सर्व प्रश्नांची उत्तरे ‘रक्तांचल २’ मधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

कलाकार – माही गिल, क्रांती प्रकाश झा, निकितीन धीर, करन पटेल, भूपेश सिंग, सोंदर्या शर्मा, रवि खानविलकर आणि आशीष विद्यार्थी कधी – ११ फेब्रुवारी कुठे – एमएक्स प्लेअर

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi movies should be translated into hindi akp