गेल्या २५ जून रोजी बॉलिवूडचा ‘किंग’ शाहरूख खानने फिल्म इंडस्ट्रीतील २९ वर्षे पूर्ण केली आहेत. शाहरूख खान लवकरच सुप्रसिद्ध दिग्दर्शक एटली यांच्या आगामी ‘बादशाह’ चित्रपटात झळकणार आहे. येत्या काही दिवसांतच चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होणारेय. याच चित्रपटातून साउथची सुप्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार, अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या. यावर आता शिक्कामोर्तब लागला असून शाहरूख खानसोबत नयनतारा हिचंच नाव फायनल झालं आहे. अभिनेत्री नयनतारा हिने या चित्रपटासाठी साइन केलं असल्याचं देखील बोललं जातंय.

प्रसिद्ध तमिळ दिग्दर्शक एटली हे त्यांच्या आगामी ‘बादशाह’ या चित्रपटासाठी गेल्या दोन वर्षापासून तयारी करत आहेत. त्यांच्या या चित्रपटातून साउथची अभिनेत्री नयनतारा ही शाहरूख खानसोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर दिग्दर्शक एटली यांनी एका मुलाखतीत बोलताना या चर्चा केवळ अफवा असल्याचं देखील सांगितलं होतं. पण आता त्यांच्या चित्रपटात शाहरूख सोबत नयनतारा रोमान्स करताना दिसून येणार यावर शिक्कामोर्तब लागला आहे. रेड चिलीज ही शाहरुख खानची कंपनी या चित्रपटाचं प्रोडक्शन करणार आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्री नयनताराने साइन देखील केलंय. इतकंच नाही तर या चित्रपटासाठी नयनताराने बरीच मेहनत सुरू केलीय. या चित्रपटात नयनताराच्या भूमिकेबाबत अद्याप कोणती माहिती समोर आलेली नाही.

नयनतारा ही साउथ फिल्म इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने यापूर्वी तेलुगू, तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलंय. नयनताराने २००३ साली ‘Manassinakkare’ या चित्रपटातून तिच्या करिअरला सुरूवात केली होती. अलिकडच्या काळात ती मल्याळम चित्रपट ‘Nizhal’ या चित्रपटात दिसली होती. त्याचप्रणाणे डिस्ने + हॉटस्टारने नुकतंच मिलिंद राओ दिग्दर्शित ‘Netrikann’ चित्रपटाची घोषणा सुद्धा केलीय. ‘चंद्रमुखी’, ‘गजनी’, ‘श्री राम राज्यम’, ‘पुथिया नियमम’ या चित्रपटातून झळकलेल्या नयनताराला आता शाहरूख खानसोबत पाहण्यासाठी फॅन्स आतुर झालेले आहेत. साउथच्या अभिनेत्रीचा बॉलिवूडच्या रोमान्स किंगसोबतची केमिस्ट्री पाहणं खरोखरंच रंजकदार असणार, हे मात्र नक्की.

 

या चित्रपटाचं लोकेशन, लुक टेस्ट, कास्टिंग आणि इतर महत्वाच्या गोष्टींवर काम वेगाने सुरू करण्यात आलंय. या चित्रपटात शाहरूख खान डबल रोलमध्ये दिसणार असून तो त्याचे सिक्स पॅक देखील दाखवताना दिसून येणार आहे. या चित्रपटाच्या प्री-प्रोडक्शन दिग्दर्शक एटली यांनी काम सुरू केलंय. या वर्षीच्या अखेरपर्यंत या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण होईल, असा अंदाज देखील लावण्यात येतोय.

अभिनेता शाहरूख खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या तो त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत ‘मस्तानी गर्ल’ दीपिका पादुकोण झळकणार आहे. सोबत जॉन अब्राहम सुद्धा निगेटिव्ह रोलमध्ये दिसणार आहे. ‘पठाण’ चित्रपटाच्या शूटिंग नंतर तो दिग्दर्शक एटली यांच्या ‘बादशाह’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे.