OTT Releases This Week : जुलै महिन्याचा नवा आठवडा सुरू झाला आहे. १४ जुलै ते २० जुलैदरम्यान, ओटीटीवर नवीन वेब सीरिज आणि चित्रपट प्रदर्शित होत आहेत.

केके मेननच्या ‘स्पेशल ऑप्स सीझन २’ची सर्व जण आतुरतेने वाट पाहत आहेत, नागार्जुन-धनुष आणि रश्मिका मंदाना यांचा ‘कुबेरा’, संजय दत्त व मौनी रॉय यांचा ‘द भूतनी’, तेलुगूचा ‘भैरवम’ यांचाही समावेश आहे. या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि सीरिजची संपूर्ण यादी पाहूया.

स्पेशल ऑप्स सीझन २

नीरज पांडे यांची ‘स्पेशल ऑप्स सीझन २’ ही वेब सीरिज गेल्या शुक्रवारी, ११ जुलै रोजी प्रदर्शित होणार होती; परंतु ती पुढे ढकलण्यात आली. आता ती या आठवड्यात १८ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. केके मेनन पुन्हा एकदा रॉ ऑफिसर हिंमत सिंगच्या भूमिकेत पडद्यावर परतत आहेत. या सीरिजमध्ये आपल्याला पुन्हा करण टॅकर, विनय पाठक, मुझम्मिल इब्राहिम, सैयामी खेर व मेहर विज यांसारखे परिचित चेहरे पाहायला मिळतील. यावेळी ताहिर राज भसीन आणि प्रकाश राज यांसारखे दिग्गज कलाकारही नवीन कलाकारांमध्ये दाखल झाले आहेत. ही सीरिज तुम्हाला जिओ हॉटस्टारवर पाहायला मिळेल.

कुबेरा (Kuberaa)

गेल्या महिन्यात २० जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला ‘कुबेरा’ आता एका महिन्यानंतर ओटीटीवर येत आहे. बॉक्स ऑफिसवर ८८.८० कोटी रुपयांचा कलेक्शन करणाऱ्या या चित्रपटात नागार्जुनसह धनुष आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘कुबेरा’ चित्रपटासाठी धनुषने त्याच्या भूमिकेची तयारी करण्यासाठी तिरुपतीच्या रस्त्यावर भिकारी बनून काही दिवस काढले. धनुषच्या या कृतीचं सध्या खूप कौतुक होतंय. हा चित्रपट तुम्ही १८ जुलैला प्राइम व्हिडीओवर बघू शकता.

द भूतनी (The Bhootnii)

संजय दत्त, मौनी रॉय, पलक तिवारी व सनी सिंग स्टारर दिग्दर्शक सिद्धांत सचदेव यांचा ‘द भूतनी’ हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. मे महिन्यात आलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपत्ती ठरला. या कथेत शंतनू आणि त्याचे काही कॉलेज मित्र आहेत. कथेची सुरुवात होते व्हर्जिन ट्रीपासून. सेंट व्हिन्सेंट कॉलेजमध्ये उभ्या असलेल्या या झाडाला काही लोक शापित समजतात. असं म्हणतात की, या झाडावर राहणारी एक भूतनी दरवर्षी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी जागी होते. खऱ्या प्रेमाच्या शोधात ही भूतनी दरवर्षी कोणाला तरी टार्गेट करते आणि व्हॅलेंटाईन डेला भूतनीने टार्गेट केलेला मुलगा होळीच्या दिवशी मरतो. हा चित्रपट १८ जुलैला तुम्ही झी ५वर पाहू शकता.

वीर दास : फूल व्हॉल्यूम (Vir Das: Fool Volume)

एमी पुरस्कार विजेता विनोदी कलाकार आणि अभिनेता वीर दास एका नवीन स्टँडअपसह परतत आहे. ‘वीर दास : फूल व्हॉल्यूम’चे चित्रीकरण मुंबई, न्यू यॉर्क व लंडनमध्ये झाले आहे. हा त्याचा पाचवा नेटफ्लिक्स स्पेशल आहे. ‘फूल व्हॉल्यूम’मध्ये तो विनोद आणि व्यंगांद्वारे त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक अनुभव सादर करणार आहे. तुम्ही १८ जुलैला नेटफ्लिक्सवर बघू शकता,

भैरवम (Bhairavam)

मूळ तेलुगूमध्ये बनलेला ‘भैरवम’ मे महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. ही कथा पूर्व गोदावरीच्या ग्रामीण भागातील एका पवित्र मंदिराच्या भूमीभोवती फिरते. तुम्ही हा चित्रपट १८ जुलैला झी ५वर बघू शकता.