‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता करण मेहराने आणि त्याची पत्नी निशा रावल यांच्या नात्यातील वाद आता जगजाहीर झाले आहेत. निशाने करणविरोधात शारीरिक शोषणाचे आरोप करत त्याच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणात दोघांनीही आपली बाजू माध्यमांसमोर मांडलीय. दोघांच्या या वादात मारहाणीच्या बातम्या आणि काही फोटोज सध्या समोर आले आहेत. या फोटोंमध्ये तिच्या डोक्यावर काही जखमा झालेल्या दिसून येत आहेत. यासाठी तिला सर्जरी करावी लागली. निशा-करणच्या या वादात आता निशाचा मित्र रोहित वर्माने उडी घेतलीय. निशाच्या डोक्यावर झालेल्या या जखमेबाबत मित्र रोहित वर्माने पूर्ण कहाणी समोर आणली.

निशा रावलचा मित्र आणि फॅशन डिझायनर रोहित वर्मा हा निशाच्या प्रकृतीबाबत अपडेट देण्यासाठी समोर आलाय. एका माध्यमाशी बोलताना रोहित वर्माने सांगितलं, “निशा रावलच्या डोक्याला इतकी गंभीर जखम झालेली की त्यासाठी तिला सर्जरी करावी लागली. डोक्यावर सर्जरी झाल्यानंतर निशाला आता रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय आणि ती सध्या घरी आराम करतेय. ही सर्जरी प्लॅस्टिक सर्जरी नाही, असं देखील त्याने सांगितलंय. यापुढे बोलताना रोहित म्हणाला, “तिची प्रकृती आता व्यवस्थित आहे…काल रात्रीच ती घरी आली आहे…डॉक्टर्सनी खूप चांगल्या पद्धतीने उपचार केलाय. सर्जरी उत्तम झालेली आहे. तिच्या डोक्यावर गंभीर जखम होती, त्यावर टाके पडले आहेत.”

यापुर्वीही निशाचा मित्र रोहिम वर्माने तिच्या पाठिंब्यासाठी एक पोस्ट लिहिली होती. यात त्याने लिहिलं, “सगळ्यांशी जुळवून घेणारा स्वभाव आणि कोमल मन असलेली निशा नेहमीच सौहार्दपणे प्रत्येक अडचणीवर समाधान शोधते…तिच्या आयुष्यात आलेले अनेक चढ-उतार मी जवळून पाहीलेत…तिच्या प्रत्येक अडचणीच्या काळात सुद्धा स्वतःच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत प्रत्येक संटकाशी तिने सामना केलेला आहे…पण यंदा ती रागाच्या शेवटच्या टोकाला पोहोचलेली…आणि यामुळेच ती शारीरिक रूपातून प्रभावित झाली आणि याचंच निमित्त साधत तिला चुकीची ठरवण्यात येत आहे.”


यापुढे रोहित वर्माने लिहिलं, “ही पोस्ट त्या लोकांसाठी आहे ज्यांना काही माहिती नसताना करणची बाजू घेत आहेत…हे लक्षात घ्या की एखाद्या व्यक्तीमध्ये सूड उगवण्याची भावना निर्माण होईल असं वाईट हेतूने त्याला स्पर्श करणे किंवा शारीरिक हानी पोहोचवण्याचा कुणालाच अधिकार नाही…जर हे ही तुम्हाला समजलं नसेल तर हीच योग्य वेळ आहे, तुमच्या आईला विचारा, सुरवातीला माणूस कसा बनला.”