Ott Release Of This Week : चित्रपट आणि वेब सीरिजप्रेमींसाठी ऑक्टोबर महिन्यातील शेवटचा आठवडा खूप खास ठरणार आहे. कारण- या आठवड्यात ओटीटीवर एकापेक्षा एक चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना घरी बसून बॉलीवूड, साऊथ आणि हॉलीवूडमधील अॅक्शन, थ्रिलर, रोमान्स आणि रहस्यमय चित्रपट, सीरिज पाहायला मिळणार आहेत. या यादीत ‘बागी ४’ ते ‘लोका चॅप्टर १ : चंद्रा’ या चित्रपटांचा समावेश आहे.
‘इडली कढाई’ – बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर दाक्षिणात्य अभिनेता धनुष लिखित व दिग्दर्शित ‘इडली कढाई’ हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात धनुषने अभिनयसुद्धा केला आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर अरुण विजय, सत्यराज, पी. समुथिरकानी, निथ्या मेनन, शालिनी पांडे असे अनेक कलाकार पाहायला मिळत आहेत. या चित्रपटाची कथा एका अशा व्यक्तीच्या अवतीभोवती फिरते, ज्याचे वडील एक पारंपरिक इडलीचं दुकान चालवत असतात. हा चित्रपट २९ ऑक्टोबरला ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित होणार आहे.
द विचर सीझन ४ – ‘द विचर सीझन ४’ हॉलीवूडमधील एक काल्पनिक ड्रामा सीरिज आहे आणि ती लेखक आंद्रेज सपकोव्स्की यांच्या पुस्तकावर आधारित आहे. या सीरिजमध्ये हेनरी कैविल, आन्य चालोत्रा व फ्रेया अॅलन मुख्य भूमिकेत आहेत. ही सीरिज ३० ऑक्टोबरला ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित होणार आहे.
लोका चॅप्टर १ : चंद्रा – ‘लोका चॅप्टर १ : चंद्रा’ हा एक सुपरहिट मल्याळी चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन डोमिनिक अरुण यांनी केलं आहे. त्यामध्ये कल्याणी प्रियदर्शनने चंद्रा नावाच्या एका रहस्यमयी महिलेची भूमिका साकारली आहे, जी एका जाळ्यात अडकते. हा चित्रपट ३१ ऑक्टोबरला ‘जिओ हॉटस्टार’वर प्रदर्शित होणार आहे.
बागी ४ – टायगर श्रॉफ, संजय दत्त, सोनम बाजवा व हरनाज संधू यांचा ‘बागी ४’ हा एक अॅक्शनने भरलेला चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन ए. हर्षनं केलं आहे. या चित्रपटाच्या पूर्वीच्या ३ भागांनाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे जर हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये पाहिला नसेल, तर तुम्ही हा चित्रपट ३१ ऑक्टोबरपासून ‘प्राइम व्हिडीओ’वर घरबसल्या पाहू शकता.
मारीगल्लू – देवराज पुजारी लिखित व दिग्दर्शित ‘मारीगल्लू’ ही एक थ्रिलर कन्नड सीरिज आहे. त्यामध्ये प्रवीण तेजस आणि निनाद हरित्सा यांच्यासह इतरही काही कलाकार पाहायला मिळतात. ३१ ऑक्टोबरपासून हा चित्रपट ‘झी ५’वर पाहू शकता.
