सध्या चित्रपटांबरोबरच वेबसीरिजची सुद्धा लोकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतीच प्रदर्शित झालेली ‘क्लास’ ही वेबसीरिज सध्या चांगलीच चर्चेत आहे. स्पॅनिश वेसबीरीज ‘एलाइट’वर ही वेबसीरिज आधारित असून दिल्लीतील एका आंतरराष्ट्रीय शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवनशैलीवर ही वेबसीरिज बेतलेली आहे.
अभिनेता चंदन के आनंद यांनी यात उद्योगपती सुरज अहुजा ही भूमिका साकारली आहे. यामध्ये त्यांच्या मुलीच्या हत्येच्या भोवती आपल्याला हे कथानक फिरताना दिसतं. या वेबसीरिजबद्दल मिश्र प्रतिक्रिया येत आहेत कारण यात बराच बोल्ड कंटेंट आहे. शिवीगाळ, बोल्ड सीन्स, समलैंगिक सीन्स, हिंसा अशा बऱ्याच गोष्टींचा यात भडिमार केलेला असल्याने या वेबसीरिजवर टीका होत आहे. याविषयी चंदन यांनी हिंदुस्तान टाइम्सशी संवाद साधताना भाष्य केलं आहे.
या वेबसीरिजमधून जातीयवाद, भेदभाव आणि मोठ्या उद्योजकांच्या बिघडलेल्या मुलांच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. याबद्दल चंदन म्हणाले, “एक अभिनेता म्हणून या वेबसीरिजमध्ये काम करताना खूप मजा आली. यावर टीका होत आहे, मिश्र प्रतिक्रिया येत आहेत, आणि त्या येणं स्वाभाविक आहे, कारण आजवर आपण काहीच बघितलेलं नाही. ही कथा काळाच्या पुढची आहे.”
या वेबसीरिजने समाजाला आरसा दाखवला असल्याचं चंदन यांनी स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले, “बरीच लोक ही वेबसीरिज बघत आहेत. आमचा हेतू साध्य झाला आहे. या वेबसीरिजमधून ‘LGBTQ’ कम्यूनिटीबद्दल आणि इस्लामोफोबियाबद्दल आम्ही भाष्य केलं आहे याचं बऱ्याच पाकिस्तानी आणि बांग्लादेशी लोकांनी कौतुक केलं आहे. पठाणसारखा चित्रपट सुपरहीट होऊ शकतो कारण ते मनोरंजन आहे, तर आमची वेबसीरिजही नक्कीच हीट ठरेल. पण एखादी व्यक्ती एका दोरीच्या सहाय्याने हेलिकॉप्टरला लटकून स्टंट करू शकते, आणि शाहरुख खानने फक्त एकदा पाय आपटून जॉन अब्राहम दरीत कोसळून मरतो यावर माझा कदापि विश्वास बसू शकत नाही. पण आमची ‘क्लास’ ही वेबसीरिज हे वास्तव आहे जे आज आपल्या आसपास घडत आहे.”
याबरोबरच चंदन यांनी या मुलाखतीमध्ये बॉलिवूड पार्टीज आणि ड्रग्सच्या वापरावरही भाष्य केलं आहे. चंदन यांनी ‘लव आज कल’, ‘गुंजन सक्सेना’, ‘रंगबाज’सारख्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. आता चंदन सिद्धार्थ आनंद यांच्या आगामी ‘फायटर’ या चित्रपटात हृतिक रोशन आणि दीपिका पदूकोणसह झळकणार आहेत.