Panchayat Fame Actress : मनोरंजन क्षेत्रातल्या नवोदित कलाकार किंवा ‘आउटसायडर्स’ना स्वत:च स्थान निर्माण करण्यासाठी कायमच संघर्ष करावा लागतो. काही वेळेस एक ‘आउटसायडर’ म्हणून त्यांना कमी दर्जाची वागणूकही मिळते. या कलाकारांमध्ये अभिनयाचे उत्तम गुण असले तरी त्यांच्याबाबत आणि त्यांच्या कामाबाबत कधीकधी दुजाभाव केला जातो. असाच ‘आउटसायडर’ असल्याचा अनुभव एका हिंदी अभिनेत्रीने व्यक्त केला आहे.

लोकप्रिय वेबसीरिज ‘पंचायत’मधील सान्विका या अभिनेत्रीने तिचा ‘आउटसायडर’ असल्याचा अनुभव व्यक्त केला आहे. ‘पंचायत’ या सीरिजमध्ये रिंकीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री सान्विकाने याबद्दल इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीद्वारे तिने इंडस्ट्रीमधील आऊटसायडर म्हणून मिळत असलेल्या आदर, सन्मान आणि समान वागणुकीबद्दलची पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये सान्विका असं म्हणते, “कधीकधी मला असं वाटतं, की मी याच क्षेत्रातली व्यक्ती असते किंवा कदाचित एका चांगल्या पार्श्वभूमीतून या क्षेत्रात आले असते, तर काही गोष्टी खूप सोप्या झाल्या असत्या (कदाचित, मला माहित नाही). आदर-सन्मान आणि समान वागणूक मिळणं इतकंच मिळालं तरी संघर्ष थोडा कमी झाला असता.”

सान्विकाची इन्स्टाग्राम स्टोरी

सान्विका इन्स्टाग्राम स्टोरी – स्क्रीनशॉट

सान्विकाने शेअर केलेल्या तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये कोणत्याही घटनेचा किंवा व्यक्तीचा उल्लेख नाही. परंतु तिच्या पोस्टवरून असे दिसते की, तिला एक ‘आउटसायडर’ म्हणून एखादा अनुभव आला असावा आणि हाच अनुभव तिने व्यक्त केला आहे. ‘पंचायत’ या गाजलेल्या सीरिजमध्ये सान्विकाने रिंकी ही भूमिका साकारली आहे.

या सीरिजमधील तिची आणि जितेंद्र कुमारची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. ‘पंचायत’ या लोकप्रिय सीरिजचे आतापर्यंत तीन सीझन आले आहेत आणि नुकताच चौथ्या सीझनचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. येत्या २४ जूनपासून ‘पंचायत’चा चौथा नवा सीझन प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

दरम्यान, रिंकी फेम सान्विकाबद्दल सांगायचं झालं तर, ती मूळची जबलपूरची आहे. सान्विकाचं मूळ नाव पूजा सिंह आहे. इंडस्ट्रीत या नावाचे अनेक कलाकार असल्याने तिने तिचं नाव बदलल्याचं ‘डिजिटल कॉमेंट्री’ला सांगितलं होतं. ‘पंचायत’च्या आधी तिने काही इतरही कामे केली आहेत. पण अनेक लोक तिला ‘पंचायत’ या सीरिजमुळेच अधिक ओळखतात.