Salman Khan Shares Wish To Have Kids : काजोल व ट्विंकल खन्ना या दोघी सध्या त्यांच्या ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या नवीन शोमुळे चर्चेत आहेत. गुरुवारी (२५ सप्टेंबर) त्यांचा नवीन शो ‘अ‍ॅमेझॉन प्राइम’वर प्रदर्शित होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पहिल्याच भागात त्यांच्या या कार्यक्रमात सलमान खान व आमिर खान हजेरी लावणार आहेत.

काजोल व ट्विंकल यांच्या या नवीन कार्यक्रमाचा ट्रेलर अलीकडेच प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये आमिर व सलमान यांनी हजेरी लावल्याचं पाहायाला मिळालं. त्यांच्यासह बॉलीवूडमधील इतरही काही सेलिब्रिटींची झलक पाहायला मिळाली. आता लवकरच या शोचा पहिला भाग प्रदर्शित होणार आहे आणि त्यामध्ये काजोल व ट्वींकल सलमान व आमिरबरोबर संवाद साधताना दिसणार आहेत.

सलमान खानची रिलेशनशिपबद्दल प्रतिक्रिया

काजोल, ट्विंकल, सलमान व आमिर यांच्यामध्ये यादरम्यान गमतीजमती, विनोद व गप्पा होताना दिसल्या. आमिरनं त्याच्या आयुष्यातील काही किस्से सांगितले; तर सलमाननंही त्याच्या भूतकाळातील रिलेशनशिपबद्दल सांगितलं. ‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार यावेळी तो म्हणाला, “जेव्हा रिलेशनशिपमध्ये दोघांमधील कोणा एकाची प्रगती होत जाते तेव्हा त्या नात्यात गोष्टी वेगळ्या पद्धतीनं सुरू होतात. त्यामुळे त्यातल्या एका व्यक्तीला असुरक्षितताही वाटते म्हणून दोघांचीही एकत्र प्रगती व्हायला हवी, असं माझं मत आहे.”

सलमान खानने व्यक्त केली इच्छा

आमिरनं पुढे सलमानला त्याच्या रिलेशनशिपबद्दल विचारलं तेव्हा तो म्हणाला, “नाही जुळलं, तर नाही जुळलं. जर कोणी दोषी असेल, तर तो मी आहे.” यावेळी अभिनेत्यानं पुढे मुलांबद्दलची इच्छा व्यक्त केली. तो म्हणाला, “मुलं, एक दिवस मलाही मुलं असतील, लवकरच”.

काजोल या कार्यक्रमाबद्दल पुढे म्हणाली, “ट्विंकल आणि मी खूप गप्पा मारत होतो तेव्हा या कार्यक्रमाची आम्हाला कल्पना सुचली. म्हणूनच आम्ही हा कार्यक्रम सुरू केला. कारण- हेच आम्हाला खूप जास्त आवडतं, गप्पा मारायला, मस्ती करायला, मित्रांबद्दल, इंडस्ट्रीबद्दल बोलायला. त्यामुळे इथे कोणी होस्ट नसणार, काही स्क्रिप्टेड गोष्टीही नसणार. ‘टू मच…’मध्ये सगळं खूप नैसर्गिक आणि अनफिल्टर्ड असणार आहे, ज्यामधून आमच्याशी इतर लोकही जोडले जातील.”

ट्विंकल पुढे या कार्यक्रमाबद्दल म्हणाली, “आम्हाला आधीच ठरवून उत्तर देणं हे नको आहे. आम्हाला खूप खरी आणि त्या क्षणी दिलेली उत्तरं हवी आहेत. मोकळेपणानं संवाद साधायचा आहे. त्यामुळे आम्ही असे प्रश्न विचारणार की, ज्याबद्दल अनेकांना ते जाणून घेण्याची उत्सुकता असेल. आम्हाला आमच्या कलाकार मित्र-मैत्रिणींबरोबर गप्पा मारायच्या आहेत आणि त्यामार्फत प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या कलाकारांबद्दलही जाणून घेता यावं, असं वाटतं.