थिएटरमध्ये रिलीज झालेला ‘धडक २’ अखेर ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. थिएटर रिलीजच्या ८ आठवड्यांनी हा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. सिद्धांत चतुर्वेदी व तृप्ती डिमरी यांच्या चित्रपटाचं प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं होतं, पण त्याचं बॉक्स ऑफिस कलेक्शन मात्र निराशाजनक होतं.
धडक २ आज शुक्रवारी, २६ सप्टेंबर रोजी ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला आहे. धडक २ कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल, या सिनेमात कोणते कलाकार आहेत व त्याचे बॉक्स ऑफिस कलेक्शन किती आहे, ते जाणून घेऊयात.
‘धडक २’ ओटीटीवर कुठे पाहता येणार?
धडक २ हा थिएटरमध्ये रिलीज झाल्यावर दोन महिन्यांनी ओटीटीवर आला आहे. धडक २ नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. इन्स्टाग्रामवर नेटफ्लिक्सच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर यासंदर्भात पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
‘धडक २’ बॉक्स ऑफिस कलेक्शन
धडक २ हा चित्रपट १ ऑगस्ट २०२५ रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात वेगवेगळ्या जातीतील निलेश व विधी यांची लव्ह स्टोरी दाखवण्यात आली होती. सॅकनिल्कच्या वृत्तानुसार, धडक २ ने भारतात २२.४५ कोटी आणि जगभरात ३१.५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.
धडक २ मधील कलाकार
‘धडक २’ मध्ये तृप्ती डिमरी आणि सिद्धांत चतुर्वेदीबरोबर झाकीर हुसेन, सौरभ सचदेवा, विपिन शर्मा, साद बिलग्रामी, हरीश खन्ना, प्रियांक तिवारी आणि अनुभा फतेहपुरा यांच्याही भूमिका आहेत. सिद्धांत व तृप्तीचा हा चित्रपट गेल्या वर्षी २४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु देशातील जातीयता दाखवत असल्याने त्याच्या प्रदर्शनाला सेन्सॉर बोर्डाने मंजुरी दिली नाही, नंतर तब्बल १६ बदल करून तो चित्रपट प्रदर्शित करण्याची मंजुरी मिळाली.
धडक २ हा चित्रपट २०१८ मध्ये आलेल्या सुपरहिट धडक सिनेमाचा सीक्वेल आहे. धडकमध्ये ईशान खट्टर व जान्हवी कपूर होते. याचे दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केले होते. तर धडक २ चे दिग्दर्शन शाजिया इक्बालने केले आहे. दोन्ही चित्रपटांची निर्मिती करण जोहरचे धर्मा प्रोडक्शन व झी स्टुडिओजने केले आहे.