साऊथ सिनेमांमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रियामणी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवरील बहूचर्चित ‘द फॅमिली मॅन २’ मध्ये सूचीच्या भूमिकेत झळकली. तिने यापूर्वी बॉलिवूडचा ‘किंग’ शाहरूख खानसोबत ‘चेन्नई एक्सप्रेस’ चित्रपटात सुद्धा काम केलंय. यात तिने ‘चेन्नई एक्सप्रेस’चं सुपरहिट गाणं १२३४ मध्ये आपल्या डान्सचा जबरदस्त जलवा दाखवला. हे गाणं भरपूर हिट झालं होतं. यावेळचा एक किस्सा आठवत प्रियामणीने एक खुलासा केलाय. या गाण्याच्या शूटदरम्यान बॉलिवूडचा किंग शाहरूख खानने तिला ३०० रूपये दिले होते, ते तिने आजही जपून ठेवले आहेत, असं प्रियामणीने सांगितलंय.

अभिनेत्री प्रियामणीने नुकतीच एका माध्यमाला मुलाखत दिलीय. या मुलाखती दरम्यान तिने हा खुलासा केलाय. यावेळी तिनं सांगितलं, “‘चेन्नई एक्सप्रेस’चं सुपरहिट ठरलेलं १२३४ गाणं वाई इथे जवळजवळ पाच रात्रींमध्ये शूट करण्यात आलं होतं. अभिनेता शाहरूख खानला बॉलिवूडचा बादशाह म्हटलं जातं. ते सगळ्या मोठे सुपरस्टार आहेत आणि त्यांचं यश त्यांनी कधीच डोक्यात जाऊ दिलं नाही. त्यांना कोणत्याच प्रकारचा घमंड नाही. ज्यावेळी आम्ही शूटिंग करत होतो त्यावेळी ते अगदी प्रमाने आणि एखाद्या सामान्य व्यक्तींप्रमाणेच वावरत होते. ते प्रत्येकासोबतच अगदी सहजपणे मिसळून जातात. मला असं वाटतं, त्यांचं व्यक्तित्व, त्यांचा करिश्मा पाहूनच लोकांना त्यांच्या प्रेमात पाडायला भाग पाडतात.”

अभिनेत्री प्रियामणीने शाहरूखचं कौतुक करत त्याच्यासोबतचा अनुभव देखील तिने शेअर केलाय. यावेळी तिने सांगितलं, ” शूटिंगच्या पहिल्या दिवसापासूनच आम्ही दोघेही अगदी सहज मिसळून गेलो. गाण्याच्या शूटिंगासाठी मी एक दिवस आधीच पोहोचले होते, तेव्हा माझी त्यांच्याशी भेट झाली होती. तेव्हापासून ते शूटिंग संपेपर्यंत मला त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने वागणूक दिली, माझी काळजी घेतली. इतकंच नाही तर शूटिंगमध्ये जसा ब्रेक मिळत होता, त्यावेळी आम्ही त्यांच्या आयपॅडवर ‘कौन बनेगा करोडपति’ सुद्धा खेळलो होतो. यासाठी त्यांनी मला ३०० रूपये दिले होते. ते आजही मी सांभाळून ठेवले आहेत.”