पंतप्रधान नरेंन्द्र मोदींनी देशात सुरू केलेल्या स्वच्छता अभियानाबाबत उलटसुलट चर्चा सुरू असली, तरी बॉलिवूड सेलेब्रिटींपासून सामान्य नागरिकांपर्यंत अनेकजण या स्वच्छता अभियानात सहभागी होताना नजरेस पडत आहेत. चांगल्या कामासाठी सदैव पुढाकार घेणारी बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने स्वच्छतेच्या या कामात आपले हात खराब करून घेण्यास जरा सुध्दा संकोच केला नाही. मुंबईतील वर्सोवा उपनगरात असलेल्या एका झोपडपट्टीतील सफाईच्या कामात प्रियांकाने हिरिरीने पुढाकार घेतला. प्रियांकाने वर्सोवामध्ये असलेल्या या झोपडपट्टीचा संपूर्ण परिसर स्वच्छ तर केलाच, परंतु त्याचे सुशोभिकरणदेखील केले.
‘स्वच्छ भारत’ अभियानात आपले योगदान देणाऱ्या प्रियांकाने परिसराची स्वच्छता करतानाचा स्वत:चा व्हिडिओ टि्वटरवर शेअर केला आहे. पंतप्रधानांनी ‘स्वच्छ भारत’ अभियानात सहभागी होण्यासाठी आपल्या नावाची घोषणा केल्याने आपल्याला खूप आनंद झाल्याची भावना प्रियांकाने व्यक्त केली आहे. व्हिडिओमध्ये प्रियांका सदर परिसराची स्वच्छता करताना जशी नजरेस पडते, त्याचप्रमाणे या परिसराविषयी आपल्या आठवणी सांगतानादेखील दिसते. या परिसराबाबतच्या आपल्या आठवणींना उजाळा देताना ती म्हणते, ‘अग्निपथ’ चित्रपटाच्या चित्रिकरणाच्यावेळी मी या परिसरात आले होते. आम्ही बस्तिचा एक मोठा सेट इथे उभारला होता. या परिसरात राहाणीरी लोक अजाही माझ्या लक्षात आहेत. मुले कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर खेळत असायची आणि तेच त्यांचे जिवन होते. हा परिसर केवळ स्वच्छ न करता स्वच्छतेबरोबरच या परिसराचे सुशोभिकरण करण्याची योजना आहे. त्याचप्रमाणे, येथील रहिवाश्यांना स्वच्छतेबाबत जागृक करून, स्वच्छतेचे सातत्य टिकविण्यासाठी प्रवृत्त करण्याचा मानसदेखील तिने बोलून दाखविला.

हातात गुलाबी रंगाचे हातमोजे आणि तोंडावर मास्क बांधून, आई आणि अन्य सहकाऱ्यांसह वर्सोवामधील हा परिसर स्वच्छत करण्यासाठी सज्ज झालेली प्रियांका या व्हिडिओमध्ये दिसते. त्याचप्रमाणे धुळ-माती आणि घाणीत हात घालून, वोळप्रसंगी हातात फावडे आणि खराटा घेऊन कठोर परिश्रम घेत इमानेइतबारे परिसराची स्वच्छता करणारी प्रियांका या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. सोळा दिवस चाललेल्या या स्वच्छता अभियानात आठ ट्रक भरून घाण उचलण्यात आली.

देशभरात सुरू असलेल्या या अभियानातील प्रियांकाच्या योगदानाला खुद्द पंतप्रधान नरेंन्द्र मोदींकडून कौतुकाची थाप मिळाली. प्रियांकाने ‘सन फाऊंण्डेशन’चे विक्रमजित एस. साहानी, अभिनेता सिध्दार्थ रॉय कपूर, ‘एनडी टिव्ही’चे प्रणय रॉय, विक्रम चंद्रा आणि सहकारी, मधुर भंडारकर, ‘आयआयएम-ए’चे विद्यार्थी आणि शिक्षक, मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षा चालकांच्या संघटना, मुंबई लायन्स क्लब, कनिका सदानंदा आणि पीसी रॉकस्टारचे सदस्य इत्यादीचे ‘स्वच्छ भारत’ अभियानासाठी नामांकन केले आहे.