Five Richest South Indian Actors : सध्या दाक्षिणात्य सिनेमांचा आणि कलाकारांचा देशभरात बोलबाला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बॉलीवूडमधील चित्रपटांतही अनेक दाक्षिणात्य कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतात; तर बऱ्यापैकी सगळे त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइलसाठी ओळखले जातात. पण, तुम्हाला माहीत आहे का, साऊथमधील सगळ्यात श्रीमंत अभिनेते कोणते आहेत?
साऊथमधील अनेक अभिनेत्यांची स्वत:ची आलिशान घरं आहेत. कोट्यवधींची संपत्ती आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का साऊथमधील पाच सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील सुपरस्टार रजनीकांत यांचा समावेश नाही. चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत साऊथमधील श्रीमंत अभिनेते.
‘हे’ आहेत साऊथमधील सर्वात श्रीमंत अभिनेते
अल्लू अर्जून – साऊथमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे अल्लू अर्जून. ‘पुष्पा’ चित्रपटामुळे त्याची देशभरात क्रेझ निर्माण झाली. अल्लू अर्जूनच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर त्याने आजवर अनेक चित्रपटांत मुख्य नायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनयाव्यतिरिक्त त्याची स्वत:ची निर्मिती संस्थासुद्धा आहे. यासह तो ब्रँड एंडोर्समेंटही करतो. अल्लू अर्जून रिएल इस्टेटमध्येही गुंतवणूक करतो. दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील सर्वाधिक श्रीमंत कलाकारांच्या यादीत अल्लू अर्जून पाचव्या क्रमांकावर आहे. ‘नवभारत टाइम्स’च्या वृत्तानुसार अल्लू अर्जूनची नेटवर्थ ४६० कोटी इतकी आहे.
ज्युनियर एनटीआर – ज्युनियर एनटीआरनेही अनेक चित्रपटांत मुख्य नायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या ‘आरआरआर’ चित्रपटामुळे तो देशभरात प्रसिद्ध झाला, तर देशाबाहेरही त्याच्या या चित्रपटाचं कौतुक झालं. ज्युनियर एनटीआरच्या नेटवर्थबद्दल बोलायचं झालं तर त्याची एकूण नेटवर्थ ही ५७१ कोटी इतकी आहे. त्याने यापूर्वी अनेक बिग बजेट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
राम चरण – राम चरण हा ज्येष्ठ अभिनेता चिरंजीवी यांचा मुलगा आहे. राम चरण ऐशो आरामात त्याचं आयुष्य जगतो. माध्यमांच्या वृत्तानुसार त्याची नेटवर्थ १३७० कोटी इतकी आहे. राम चरणने ब्लॉकबस्टर चित्रपटांतून कोट्यवधी कमावले आहेत. त्याची konidel ही स्वत:ची निर्मिती संस्थाही आहे.
चिरंजीवी – चिरंजीवी हे दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. GQच्या वृत्तानुसार त्यांची नेटवर्थ ही १६५० कोटी इतकी आहे. ते चित्रपटांव्यतिरिक्त ब्रँड इंडसोर्मेंटमधून आणि रिएल इस्टेटमधील गुंतवणूकीतून पैसे कमावतात. चिरंजीवी यांचा हैरदराबाद येथील जुबली हिल्स येथे आलिशान बंगला आहे. या बंगल्यामध्ये स्विमिंग पूलपासून टेनिस कोर्ट आणि जीमसारख्या इतर सगळ्या सोयी सुविधा आहेत.
नागार्जून अक्किननी – नागार्जून साऊथमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहेत. ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार नागार्जुन यांची नेटवर्थ ही ३,५७२ कोटी रुपये इतकी आहे. अभिनयाव्यतिरिक्त त्यांचा स्वत:चा व्यवसायही आहे. त्यांची अन्नपूर्णा स्टुडिओ नावाची स्वत:ची निर्मिती संस्थासुद्धा आहे. ते रिएल इस्टेटमधूनही कमाई करतात.
