डिसेंबर महिन्यात ‘पुष्पा 2’ च्या प्रिमिअरमध्ये चेंगराचेंगरी झाली होती. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा नऊ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर आता बरोबर एका महिन्याने ४ जानेवारी रोजी राम चरणच्या ‘गेम चेंजर’ चित्रपटाच्या एका इव्हेंटनंतर अशीच दुर्दैवी घटना घडली, ज्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
साऊथचा मेगास्टार राम चरणचा आगामी चित्रपट ‘गेम चेंजर’ सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला फार कमी दिवर बाकी आहेत, त्यामुळे चित्रपटाचे स्टार्स जोरदार प्रमोशन करत आहेत. मात्र, याचदरम्यान एक दु:खद बातमी समोर आली आहे. नुकताच या चित्रपटाचा प्री-रिलीज इव्हेंट आयोजित करण्यात आला होता आणि कार्यक्रमानंतर मोठा अपघात झाला आणि कार्यक्रमाला आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा – अमेरिकेत शिकतेय प्रसिद्ध अभिनेत्याची एकुलती एक लेक; म्हणाला, “मी २० तास प्रवास करून गेलो अन् ती…”
े
अभिनेता राम चरणच्या बहुप्रतीक्षित चित्रपट ‘गेम चेंजर’चा प्री-रिलीझ इव्हेंट ४ जानेवारी रोजी राजमुंद्री येथे झाला. या इव्हेंटला आलेले काकीनाडा जिल्ह्यातील अरवा मणिकंथा (२३) आणि ठोकडा चरण (२२) हे दोघे दुचाकीवरून जात होते. रात्री साडेनऊच्या सुमारास वाडीसालेरूजवळ व्हॅनने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर जखमींना पेद्दापुरम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण दोघांचाही मृत्यू झाला.
हेही वाचा – अभिनेत्री हंसिका मोटवानीसह तिच्या आई अन् भावाविरोधात वहिनीची पोलीस तक्रार, तीन वर्षांपूर्वी झालंय लग्न
या घटनेवर चित्रपटाचे निर्माते दिल राजू यांनी शोक व्यक्त केला. “मला नुकतंच समजलं की कार्यक्रमानंतर, घरी परत जाताना, दोन जणांचे दुःखद निधन झाले. पवन कल्याण या कार्यक्रमाला यायला तयार नव्हते, पण, राम चरण आणि मी आग्रह करून त्यांना कार्यक्रमाला बोलावलं होतं. कारण अशा कार्यक्रमांनंतर दुःखद घटना घडल्या की त्याचं खूप वाईट वाटतं. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो. आम्ही दोन्ही कुटुंबांच्या पाठीशी उभे राहू आणि त्यांना मदत करू. मी दोघांच्याही कुटुंबाला प्रत्येकी ५ लाख रुपये मदत पाठवत आहे,” असं दिल राजू म्हणाले. उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनीही प्रत्येकाच्या कुटुंबाला ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.
चित्रपटाचा ट्रेलर –
राम चरण आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी हजेरी लावलेल्या या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर चाहते आले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. या कार्यक्रमात पवन कल्याण यांनी भावनिक भाषण केले होते. ‘गेम चेंजर’ या चित्रपटात राम चरण कियारा अडवाणी आणि एसजे सूर्या यांच्यासह जयाराम, नासर, अंजली हे कलाकार आहेत. हा चित्रपट १० जानेवारी रोजी जगभरात प्रदर्शित होईल.
© IE Online Media Services (P) Ltd