Ranbir Kapoor Helps Injured Women : अभिनेता रणबीर कपूरने गेल्या काही वर्षांत विविध भूमिका साकारत बॉलीवूडमध्ये त्याचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. एकापेक्षा एक हिट चित्रपट आणि लक्षात राहणाऱ्या भूमिका यामुळे रणबीर कपूर सध्या यशस्वी अभिनेत्यांपैकी एक मानला जातो.
अलिकडेच, या अभिनेत्याने असे काही केले आहे ज्यामुळे सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत. विमानतळावर एका जखमी महिलेला मदत केल्याबद्दल लोक रणबीरचे कौतुक करत आहेत.
रणबीर कपूर अलीकडेच त्याच्या लाइफस्टाइल आणि आर्कच्या नवीन ब्रँडच्या लाँचसाठी दिल्लीला गेला होता. कार्यक्रमानंतर, दिल्लीहून मुंबईला परतताना, त्याने T3 विमानतळावर पाय फ्रॅक्चर झालेल्या एका सहप्रवाशाला मदत केली. महिलेने स्वतः तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ही घटना शेअर केली.
श्रुभाती गोस्वामी नावाच्या एका महिलेने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर रणबीर कपूर आणि एअरलाइन्सचे कौतुक करणारी पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिले, “फ्रॅक्चर झाल्यानंतर एकटी प्रवास करत आहे. व्हीलचेअर सिस्टम उत्कृष्ट होती. व्हीलचेअर अटेंडंट आणि एअरलाइन कर्मचाऱ्यांचे खूप खूप आभार. विशेषतः रणबीर कपूर, ज्याला मी अचानक ‘सिक्योरिटी पॉईंट’जवळ भेटले, त्याने मला मदत केली. रणबीर कपूर, दयाळूपणा दाखवला यासाठी तुमचे आभार.”
सेलिब्रिटी सहसा आपले चेहरे लपवतात आणि विमानतळावरील गर्दीतून निघून जातात, पण रणबीर कपूरने सिक्योरिटी पॉईंटच्या ठिकाणी महिलेला ज्या प्रकारे त्याने मदत केली ते पाहून चाहते त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, “रणबीर, माझ्याकडे फक्त एकच हृदय आहे, तू ते किती वेळा जिंकशील?” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, “रणबीरने एखाद्याला मदत करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याने बऱ्याच वेळा लोकांची मदत केली आहे.”
रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली. आता तो २०२६ मध्ये दोन मोठ्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एकीकडे, तो साई पल्लवीबरोबर ‘रामायण’मध्ये दिसणार आहे, तर दुसरीकडे, तो संजय लीला भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’ मध्ये आलिया आणि विकीबरोबर काम करताना दिसणार आहे.