Rani Mukerji on Keeping Her Daughter Away From Public :राणी मुखर्जीने अलीकडेच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला. या संभाषणात तिने तिची चित्रपट कारकीर्द, तिला नुकताच मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार, तिचे वैयक्तिक आयुष्य आणि तिची मुलगी यांबद्दल चर्चा केली. अभिनेत्री आणि तिच्या पतीने तिच्या मुलीला लोकांच्या नजरेपासून दूर का ठेवण्याचा निर्णय का घेतला हेदेखील सांगितले.

एएनआयशी बोलताना राणी म्हणाली, “आमच्या दोघांचेही आमच्या मुलीबद्दलचे दृष्टिकोन सारखेच आहेत. आम्हाला कधीच तिला अशा परिस्थितीत ठेवायचे नव्हते, जिथे तिला जास्त प्रसिद्धी मिळेल. ज्यामुळे तिला असे वाटेल की, तिच्याबरोबर काहीतरी खास घडत आहे.”

राणी मुखर्जी पुढे म्हणाली, कारण जेव्हा ती मोठी होईल आणि तिच्या आवडीचे करिअर ती निवडेल, तेव्हा तिला जी काही प्रसिद्धी मिळेल, ती तिच्या स्वतःच्या गुणवत्तेने मिळवेल. तिला ती प्रसिद्धी तिचे पालक प्रसिद्ध असल्यामुळे मिळता कामा नये. तिने ती स्वतः मिळवली पाहिजे, ती तिला योगायोगाने मिळू नये.” राणी मुखर्जीने असेही म्हटले की, आदिराने गोपनीयतेच्या बाबतीत तिच्या वडिलांना फॉलो केले आहे आणि तिचा दृष्टिकोन मजबूत आहे, जो तिला मोठी होताना तिचे विचार व्यक्त करण्यास मदत करील.

त्याच मुलाखतीत राणी मुखर्जीने, मातृत्व आणि काम यांत संतुलन कसे राखावे याबद्दलही माहिती दिली. ती म्हणाली, “मी जेव्हा ‘हिचकी’ चित्रपट केला तेव्हा आदिरा १४ महिन्यांची होती आणि मी तेव्हाही तिला स्तनपान करीत होते. म्हणून मला सकाळी दूध पंप करून जावे लागत असे आणि आणि मी शहरातील एका कॉलेजमध्ये शूटिंग करीत होते. जुहू येथील माझ्या घरापासून तिथे पोहोचण्यासाठी सुमारे दोन तास लागतात आणि तिथे वाहतूक कोंडी असते. म्हणून माझी एक योजना होती. सकाळी, दूध काढल्यानंतर मी ६:३० वाजता निघायचे आणि शूटिंगला जायचे. माझा पहिला शॉट सकाळी ८ वाजता असायचा आणि मी दुपारी १२:३० ते १ वाजेपर्यंत सर्व काही पूर्ण करायचे.”

आदिरा १० वर्षांची झाली…

राणी पुढे म्हणाली, “माझ्या युनिटने आणि माझ्या दिग्दर्शकाने इतके नियोजन केले होते की, मी माझे शूटिंग त्या सहा-सात तासांत पूर्ण करेन. शहरातील वाहतूक सुरू होण्यापूर्वी मी पहाटे ३ वाजता घरी पोहोचायचे. मी माझा चित्रपट अशा प्रकारे बनवला.” आदिराचा जन्म ९ डिसेंबर २०१५ रोजी झाला आणि आता ती १० वर्षांची आहे.