मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचवण्याच्या उद्देशाने लेखक – दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘श्री शिवराज अष्टक’ ही संकल्पना आणली. या संकल्पनेतील सहावे चित्रपुष्प म्हणजेच ‘रणपति शिवराय – स्वारी आग्रा’ हा चित्रपट १९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लेखक व दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी समाजमाध्यमावरून चित्रपटाची नुकतीच घोषणा केली.
छत्रपती शिवाजी महाराज, मराठा साम्राज्य आणि एकूणच शिवकालीन काळ दिग्पाल लांजेकर यांनी ‘शिवराज अष्टक’ या मराठी चित्रपटांच्या माध्यमातून मांडला आहे. या मालिकेतील फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज आणि सुभेदार या पाचही चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या पार्श्वभूमीवर शिवराज अष्टकातील सहावे चित्रपुष्प ‘रणपति शिवराय – स्वारी आग्रा’ हा नवीन चित्रपट १९ फेब्रुवारी २०२६ पासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोठमोठ्या शत्रूंना आपल्या गनिमीकाव्याच्या जोरावर धूळ चारली. बुद्धिचातुर्य, धैर्य, गनिमी कावा अशा विविध गुणांनी त्यांनी लढविलेल्या डावपेचांनी इतिहासात महत्त्वाचे स्थान मिळविले आहे. यापैकीच एक घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका. पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित ‘रणपति शिवराय – स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटातून शिवचरित्रातील हा थरारक अध्याय दिग्पाल लांजेकर आता आपल्यासमोर घेऊन येणार आहेत. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मुरलीधर छतवानी (पॅनोरमा स्टुडिओज) आणि विपुल अगरवाल, जेनील परमार (मुगाफी) चित्रपटाचे निर्माते आहेत आणि सहनिर्माते रवींद्र औटी (पॅनोरमा स्टुडिओज), तन्शा बत्रा (मुगाफी) आहेत.
असामान्य दूरदृष्टी, असीम धैर्य, प्रबळ इच्छाशक्ती आणि आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाच्या बळावर सार्वभौम स्वराज्याची निर्मिती करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र कालातीत आहे. आपल्या भावी पिढ्यांना या चित्रपटांतून आत्मविश्वास व प्रेरणा मिळावी, या उद्देशाने ‘शिवराज अष्टक’ची निर्मिती करण्यात आली आहे.