Ranvir Shorey Criticizes MNS Workers : मुंबईतील मीरा रोड भागात मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका हॉटेलच्या मालकाला मराठीत बोलला नाही म्हणून मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि त्यावरून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.

आता यासंदर्भात बॉलीवूड अभिनेता रणवीर शौरीची पोस्ट चर्चेत आली आहे. मराठी न बोलल्याबद्दल गुजराती दुकानदाराला मारहाण करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांचा रणवीरने सोशल मीडियावर तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्याने त्याच्या पोस्टमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केले आहे.

अभिनेत्याने त्याच्या एक्स अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये काही लोक मुंबईतील मीरा रोड परिसरातील एका हॉटेलच्या मालकाला मराठी न बोलल्याबद्दल मारहाण करताना दिसत आहेत. रणवीरने या घटनेला त्रासदायक म्हटले आणि महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली.

रणवीर शौरी काय म्हणाला?

अभिनेत्याने ट्विट केले की, “हे घृणास्पद आहे. काही राक्षस राजकीय फायदा आणि लक्ष वेधण्यासाठी मोकाट फिरत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था कुठे आहे?”

रणवीरने त्याच्या पोस्टवरील कमेंट्समध्ये त्याच्यावर टीका करणाऱ्यांनाही उत्तर दिले. एका वापरकर्त्याने त्याला विचारले, “तुम्ही महाराष्ट्रात किती वर्षांपासून राहत आहात? मराठी शिकण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न केले आहेत?”

रणवीर शौरीने उत्तर दिले, “सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे मी तुमच्यासारख्या अनोळखी लोकांना प्रत्युत्तर देणार नाही, जे द्वेष पसरवतात. दुसरं म्हणजे, जर तुम्हाला असं वाटत असेल की लोकांना मारहाण करून भाषा शिकवता येते, तर तुम्ही खूप चुकीचे आहात आणि शेवटची गोष्ट म्हणजे, जर तुम्हाला या मुद्द्याकडे लक्ष वेधायचं असेल, तर फक्त आपली उपजीविका करण्याचा प्रयत्न करणाऱ्या असहाय्य लोकांना मारहाण करण्यापेक्षा इतर मार्ग निवडा. राजकीय फायद्यासाठी निषेध करण्याचे अधिक सकारात्मक आणि रचनात्मक मार्ग आहेत.”

काय आहे प्रकरण?

खरं तर, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये काही लोक एका हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. तेथील हॉटेलच्या मालकाला मराठी भाषा बोलता येत नसल्यामुळे त्याला मारहाण करताना दिसत आहेत. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मारहाण करणाऱ्या लोकांच्या गळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा स्कॉर्फदेखील दिसतोय.