Renuka Shahane Talks About Parenting : रेणुका शहाणे मराठी व हिंदीमधील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्या अनेकदा विविध विषयांवरील त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करीत असतात. अनेकदा त्या व्यावसायिक आयुष्यासह खासगी आयुष्याबद्दल बोलताना दिसतात. अशातच आता त्यांनी पालकत्वाबद्दल सांगितलं आहे.
रेणुका शहाणे यांनी ‘अमुक तमुक’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगितलं आहे. त्यामध्ये त्यांनी त्यांचं बालपण, लग्न, लग्नानंतरच्या आठवणी, सासर,- मुलं आणि पालकत्व याबद्दल सांगितलं आहे. परंतु, यावेळी त्यांनी आजच्या काळातील पालकत्व खूप कठीण असल्याचं म्हटलं आहे.
पालकत्व खूप कठीण – रेणुका शहाणे
रेणुका या मुलाखतीत पालकत्वाबद्दल म्हणाल्या, “माझ्या आयुष्यातील सगळ्यात कठीण गोष्ट आहे ती म्हणजे पालकत्व. मला ही गोष्ट माझ्यासाठी खूप कठीण वाटते. कारण- आपण सतत चाचपडत असतो. जे निर्णय घेतोय, ते बरोबर आहेत की चुकीचे आहेत तेच कित्येकदा लक्षात येत नाही. मग आपली मुलं लहान होती तेव्हा आपण हे केलं असतं, तर ते जरा बरे वाढले असते का वगैरे गोष्टी खूपदा सतावत राहतात. त्यात बाहेर गेल्यानंतर इतक्या वेगवेगळ्या गोष्टी समोर असतात. जे पूर्वी अजिबात नव्हतं, सरळ आयुष्य होतं आमचं.”
रेणुका याबद्दल पुढे म्हणाल्या, “त्यामुळे तसं म्हटलं, तर आपल्या संस्कृतीमध्ये जगणं जरा सोपं आहे. आता वेगवेगळी पाश्चात्त्य गोष्टींची सरमिसळ होताना पाहत आहोत, ते भान ठेवून आपल्याला पालक बनायचं असतं की, त्याचा भाग आपण आहोत. जग आता असं बदलतच राहणार आहे. तर तुम्हाला सतत अपडेट घेत राहावं लागतं. त्याचबरोबर आपली संस्कृतीसुद्धा रुजवायची असते म्हणजे वेगवेगळ्या गोष्टीचा समतोल कसा राखायचा हा खूप मोठा प्रश्न आहे.
रेणुका पुढे म्हणाल्या, “मला असं वाटायचं की, हे फक्त मला असं वाटतंय; पण जेव्हा माझ्या आईनं म्हटलं की, तुमच्या पिढीचं जे पालकत्व आहे, ते फार कठीण आहे. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, मी जो विचार करतेय, तो बरोबरच असावा. कारण- हे काही सोपं नाहीये. आमच्या काळात आम्ही बऱ्याच सोप्या पद्धतीने वाढलो; पण आता तसं नाहीये.”
