रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुखची जोडी ही बॉलीवूडपासून ते अगदी मराठी इंडस्ट्रीपर्यंत लोकप्रिय आहे. सर्वांनाच त्यांच्या नात्याचा हेवा वाटतो. त्यांच्याकडे एक आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. तसेच दोघांचा चाहतावर्गही मोठ्या प्रमाणात आहे. रितेश आणि जिनिलीया दोघेही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते त्यांचे अनेक फोटो व मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतात.

रितेश व जिनिलीयाने शेअर केलेल्या या व्हिडीओंना चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळत असतो. अशातच सोशल मीडियावर दोघांचा एक गोड व्हिडीओ व्हायरल होत आहे. ‘फिल्मीग्यान’ या इन्स्टाग्राम पेजद्वारे रितेश व जिनिलीया यांचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये रितेशच्याभोवती चाहत्यांनी फोटोसाठी गर्दी केली आहे.

या गर्दीत रितेश हरवला असून त्याच्या भोवती जमलेली गर्दी पाहून पत्नी जिनिलीया मात्र भारावून गेल्याची दिसत आहे. नवऱ्याबद्दलचं कौतुक तिच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांत स्पष्टपणे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये रितेश एकीकडे चाहत्यांना फोटो देत आहे, तर दुसरीकडे मात्र त्याचं पत्नीकडेही लक्ष आहे. सोशल मीडियावर पती-पत्नी रितेश व जिनिलीया यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

अनेक चाहते त्यांच्या दोघांमधील बॉण्डचं कौतुकही करत आहेत. “बेस्ट जोडी”, “खूप सुंदर”, बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडी”. “या जोडीचा कायमच हेवा वाटतो”, “याला म्हणतात खरं प्रेम”, असा जोडीदार प्रत्येकाच्या आयुष्यात हवा”. अशा अनेक कमेंट्सद्वारे चाहत्यांनी या व्हिडीओखाली रितेश देशमुख व जिनिलीयाचं कौतुक केलं आहे.

दरम्यान, रितेश व जिनिलीयाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, रितेश सध्या त्याच्या ‘रेड-२’मधील भूमिकेमुळे चांगलाच चर्चेत आहे. यात त्याच्याबरोबर अजय देवगण आहे. तर आगामी काळात रितेश ‘राजा शिवाजी’ चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तर जिनिलीयाही लवकरच आमिर खानबरोबर ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे दोघांच्या आगामी चित्रपटांसाठी चाहते मंडळी चांगलीच उत्सुक आहेत.