Salman Khan talks about female fan at Galaxy Apartments : कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा तिसरा सीझन २१ जूनपासून सुरू झाला आहे. नवीन सीझनमध्ये सलमान खान पहिला पाहुणा म्हणून आला होता.
सलमान खानने कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये खूप मजा केली. दरम्यान, सलमान खानने त्या घटनेबद्दलही सांगितले, जेव्हा एका महिलेने त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला.
एपिसोडदरम्यान, कपिल शर्माने सलमान खानला विचारले की, त्याच्या घरी कधी कोणी चाहता सामान घेऊन आला आहे का? त्यावर सलमानने खरा प्रसंग सांगितला की, ज्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले. तो म्हणाला, ”हो, हे नुकतेच घडले आहे. बाहेर सुरक्षा रक्षक उभे होते. एका महिलेने त्यांना सांगितले की, तिला चौथ्या मजल्यावर जायचे आहे आणि ती आत आली”.
सलमान खानचा नोकर आश्चर्यचकित
सलमान खान पुढे म्हणाला, “त्या महिलेने दाराची बेल वाजवली आणि आमच्या नोकराने दार उघडले. नोकराला धक्का बसला. कारण- तिने सांगितले की, सलमानने मला फोन केला आहे. नोकराने तिला पाहिले आणि लगेच समजले की, सलमानने तिला फोन केला नसेल. ती एक चाहती होती. म्हणून तिला बाहेर काढले.” सलमान खान पुढे म्हणाला, असे अनेक वेळा घडले आहे. माझ्या घराचे दार लोकांसाठी नेहमीच उघडे असते.”
या वर्षी मे महिन्यात गॅलेक्सी अपार्टमेंटमधील सलमानच्या घरात एका महिलेने घुसण्याचा प्रयत्न केला तेव्हा ही घटना घडली. सुरक्षा रक्षकांना चुकवून, ती आत गेली होती; परंतु नंतर तिला पकडण्यात आले. ही घटना २० मे रोजी छत्तीसगडमधील एका पुरुषाला इमारतीत घुसण्याचा प्रयत्न करताना पकडण्यात आलेल्या दुसऱ्या घटनेनंतर लगेचच घडली. पोलिसांनी नंतर घुसखोरीच्या प्रयत्नाची पुष्टी केली.
सलमानच्या घराच्या सुरक्षेत वाढ
अलीकडच्या काही महिन्यांत, सलमान खानच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याच्या बाल्कनीत बुलेटप्रूफ काच बसवण्यात आली आहे आणि रस्त्यावर लक्ष ठेवण्यासाठी हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. एप्रिल २०२४ मध्ये गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे, जेव्हा दोन दुचाकीस्वार हल्लेखोरांनी इमारतीबाहेर गोळीबार केला होता. त्याबरोबरच सलमान खानची सुरक्षादेखील पूर्वीपेक्षा जास्त वाढवण्यात आली आहे.
कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, सलमान खान शेवटचा ‘सिकंदर’ चित्रपटात दिसला होता. तो ए. आर. मुरुगदास यांनी दिग्दर्शित केला होता. ‘सिकंदर’ने जगभरात २०० कोटी रुपयांचा व्यवसाय केला.