Sanjeev Kumar-Hema Malini : संजीव कुमार हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वांत प्रतिभावान व हुशार अभिनेत्यांपैकी एक होते. त्यांनी अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.
पण, पडद्यावर त्यांनी अनेकांची मने जिंकली असली तरी त्यांचे वैयक्तिक आयुष्य दुःखांनी भरलेले होते. अनेक रोमँटिक भूमिका साकारूनही संजीव यांनी कधीही लग्न केले नाही आणि वयाच्या अवघ्या ४७ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
हेमा मालिनी यांच्याबरोबरचे त्यांचे नाते खूप चर्चेत होते. संजीव कपूर हेमा मालिनी यांच्याशी लग्न करू इच्छित होते; पण एका अटीमुळे या जोडप्याचे प्रेम पूर्ण होऊ शकले नाही.
संजीव कुमार आणि हेमा मालिनी यांची प्रेमकहाणी कशी सुरू झाली?
संजीव कुमार आणि हेमा मालिनी यांची प्रेमकहाणी १९७२ मध्ये ‘सीता और गीता’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सुरू झाली. ‘अॅन अॅक्टर्स अॅक्टर’ नावाच्या पुस्तकात हनीफ जावेरी आणि सुमंत बत्रा यांनी सांगितले आहे की, ‘हवा के साथ साथ’ या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान महाबळेश्वरच्या रस्त्यावर स्केटिंग करताना संजीव कुमार आणि हेमा मालिनी एकमेकांना भेटले. पुस्तकानुसार, “हेमा मालिनी आणि संजीव कुमार दोघेही ट्रॉलीवर स्वार होत होते आणि ट्रॉली सैल झाली आणि एका खड्ड्याकडे वळली. सुदैवाने, रस्ता आतल्या बाजूला होता आणि दोन्ही कलाकार त्या धोकादायक खडकापासून दूर जाऊन खाली पडले. या अपघातात त्यांना किरकोळ दुखापत झाली. मृत्यूपासून थोडक्यात बचावल्यानंतर, संजीव आणि हेमा एकमेकांच्या जवळ आले.”
संजीव कुमार यांना हेमा मालिनी यांच्याशी लग्न करायचे होते
पुस्तकानुसार, संजीव कुमार हेमा मालिनी यांच्याशी लग्न करू इच्छित होते. त्यानंतर जरीवाला कुटुंबाने मद्रासमध्ये हेमा यांच्या कुटुंबाला भेटून अभिनेत्रीचा हात मागण्याचा निर्णय घेतला. संजीव आणि त्यांच्या आई शांताबेन हेमा मालिनी यांच्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन गेले. शांताबेन मिठाईचे बॉक्स घेऊन हेमा यांच्या घरी पोहोचल्या आणि हेमा मालिनींची आई जया चक्रवर्तीदेखील संजीव यांच्या कुटुंबाला भेटून आनंदी झाल्या. सुरुवातीला सर्व काही ठीक वाटत होते; पण लवकरच हेमा यांच्या वाढत्या चित्रपट कारकिर्दीत मोठा अडथळा निर्माण झाला.
हेमा यांच्या आई जया चक्रवर्ती त्यांच्या मुलीच्या संजीव यांच्याशी लग्नासाठी तयार होत्या; पण त्यांची एक अट होती. त्यांनी सांगितले की, लग्नानंतरही त्यांच्या मुलीला चित्रपटांमध्ये काम करण्याची परवानगी दिली, तरच त्या सहमत होतील. पुस्तकात म्हटले आहे की, जरीवाला कुटुंबाला ही अट स्वीकारणे कठीण होते. शांताबेन आणि संजीव सुरुवातीपासूनच स्पष्ट होते की ते लग्नानंतर हेमा यांना चित्रपटांमध्ये काम करू देणार नाहीत.
हेमा यांना आशा होती की, संजीव आपला विचार बदलतील आणि त्यांना चित्रपटांमध्ये काम करण्याची परवानगी देतील. दुसरीकडे संजीव यांना वाटले की, हेमा त्यांच्या आईला त्यांच्या कुटुंबाची इच्छा मान्य करण्यास पटवून देईल; पण कोणीही हार मानण्यास तयार नव्हते. आणि मग एका अटीमुळे संजीव आणि हेमा मालिनी यांचे नाते तुटले. नंतर हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्याशी लग्न केले आणि संजीव कुमार आयुष्यभर अविवाहित राहिले.