बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि खिलाडी अक्षय कुमार या दोघांनी देखील गेल्या तीन दशकात प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलंय. शाहरुखने आपल्या रोमॅण्टिक अंदाजात तरुणींना घायाळ केलं तर खिलाडी कुमारने आपल्या जबरदस्त अॅक्शनने तरुणींसोबतच लाखो प्रेक्षकांला इंप्रेस केलं. असं असलं तरी शाहरूख खान आणि अक्षयने त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत केवळ एकाच सिनेमात एकत्र काम केलंय. 1997 साली आलेल्या ‘दिल तो पागल है’ या सिनेमात शाहरुख आणि अक्षयने एकत्र काम केलं होतं. मात्र त्यानंतर ते एकत्र पुन्हा कधीच झळकले नाहित.
शाहरुख आणि अक्षय यापुढे देखील एकाच सिनेमात एकत्र झलकण्याची शक्यता तशी कमीच आहे. यामागे एक खास कारण आहे. शाहरुख खानने स्वत: एका मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केला होता. डीएनएला दिलेल्या मुलाखतीत शाहरुख म्हणाला ” मी यात काय करू शकतो. अक्षय कुमार खूप लवकर उठतो. तितक्या लवकर उठणं मला शक्य नाही. जेव्हा माझ्या झोपण्याची वेळ होते तेव्हा त्याची पहाट उजाडलेली असते आणि तो उठतो. त्याचा दिवस खूप लवकरच सुरू होतो. जेव्हा मी काम करायला सुरुवात करणार असतो तेव्हा त्याची बॅग पॅक करून तो घरी जाण्याच्या तयारीत असतो. मी थोडा वेगळा आहे. तुम्हाला माझ्या सारखे लोक कमीच आढळतील जे रात्री उशीरापर्यंत शूटिंग करणं पसंत करतात.” असं म्हणत शाहरुखने अक्षयसोबत काम करणं तसं कठीण असल्याचं म्हंटलं होतं.
काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार आणि शाहरुख खानचा ‘दिल तो पागल है’ च्या सेटवरील क्रिकेट खेळतानाचा एक जुना फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. यात अक्षय कुमार बॅटिंग करताना दिसत होता तर शाहरुख विकेट कीपिंग करत असल्याचं पाहायला मिळालं. ‘दिल तो पागल है’ हा सिनेमा शाहरुख खानच्या करिअरमधील सर्वात गाजलेला सिनेमा ठरला आहे.